छत्रपती शिवरायांना माऊंट एव्हरेस्टवर मानवंदना; मावळ्याची यशस्वी चढाई | पुढारी

छत्रपती शिवरायांना माऊंट एव्हरेस्टवर मानवंदना; मावळ्याची यशस्वी चढाई

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांवरील निस्सीम भक्तीपोटी ध्येयाची स्वप्नपूर्ती करत सिंहगड परिसरातील लहू उघडे या जिगरबाज मावळ्याने नुकतेच जगातील सर्वाधिक उंचीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करत छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. सोबत आणलेल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमादेखील शिखरावर विराजमान केली. या वेळी लहू यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सिंहगड परिसरातील गोर्‍हे खुर्द, माताळेवाडी येथील 34 वर्षीय लहू कोंडीबा उघडे यांनी गेल्या 23 मे रोजी सकाळी साडेआठ वाजता माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली.

या वेळी त्यांनी या शिखरावर भगवा ध्वज व तिरंगा ध्वज फडकावून शिवरायांना वंदन केले. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत मित्र, नातेवाईक व सहकार्‍यांच्या मदतीने लहू यांनी बिकट परिस्थितीत ही कामगिरी केली. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिंहगड किल्ल्यावर आई, भावासमवेत लिंबू सरबत, खाद्यपदार्थांची विक्री करून लहू यांनी खानापूर येथे शिक्षण घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याने प्रेरित होऊन लहू यांनी गिर्यारोहणाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले. कडे-कपारीतून सिंहगडावर चढाई करून त्यांनी वीर मावळ्यांच्या शौर्याच्या पाऊलखुणा प्रत्यक्ष अनुभवल्या. सिंहगडाचा तानाजी कडा, कळसूबाई शिखरापासून राज्य तसेच देशभरातील दुर्गम व उंच गडकोट, शिखर, सुळके सर करून लहू यांनी गिर्यारोहण क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले आहे.

दरीत पडलेल्या पर्यटकांना जीवदान

लिंगाणा, तोरणा, सिंहगड आदी दुर्गम गडकोटांच्या कड्यावरून पडलेल्या अनेक पर्यटकांना खोल दरीतून बाहेर काढून लहू यांनी त्यांना जीवदान दिले आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखरावर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्यानिमित्त छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन जाण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न लहू यांनी पूर्ण केले. स्थानिक मावळा जवान संघटना, तसेच विविध शिवप्रेमी संघटनांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Back to top button