राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीने कराडला येणार्‍या अडचणी सोडवा : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीने कराडला येणार्‍या अडचणी सोडवा : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहरातील तीन पूल पाडले आहेत. आता एकच पूल करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नियोजन आहे. त्याचे कामही सुरू आहे. हे काम सुमारे दोन वर्षे चालेल. मात्र, कराड शहराच्या मध्यवर्ती असलेले पूल पाडल्यामुळे शहराच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूला जाताना अनेक अडचणी येतात, अपघात होतात. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची काळजी घ्या, अपघात टाळण्यासाठी उपायोजना करा, अशा सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना शुक्रवारी दिल्या.

सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासंदर्भात सहापदरी महामार्गाच्या कामाचा आढावा आणि येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी करावयाची उपाययोजना यासंदर्भात येथील शासकीय विश्रामधाममध्ये आयोजित बैठकीत चव्हाण बोलत होते.
कराड-मलकापूर मार्गावर सर्वाधिक अडचणी जाणवत आहेत. विशेषत: नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यासाठी प्रबोधन करा. अपघात होणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणेने घेतली पाहिजे. सेवा रस्त्यांचा दर्जा सुधारा, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनची काळजी घ्या आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, असे नियोजन करा, असेही चव्हाण यांनी सांगितले.

या बैठकीस मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, अजित थोरात, राजू मुल्ला, चंद्रकांत भरडे, प्रदीप जैन, ए. पी. माहिते, कराड शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button