Latest

Nashik Onion : नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद

गणेश सोनवणे

नाशिक : टीम पुढारीकेंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर (Nashik Onion) नियंत्रणात आणण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी लागू केली. या निर्णयाचे जिल्हाभरात दिवसभर तीव्र पडसाद उमटले. प्रमु‌ख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह चांदवड, येवला, कळवण, नांदगाव आदी बाजारपेठांत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. तसेच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. जिल्हा व्यापारी असोसिएशनने निर्यातबंदी उठवली जात नाही, तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामधील कांदा लिलाव बंद राहणार आहेत. 

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात चांदवड येथे जिल्हा कांदा असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात सर्वच कांदा व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. तसेच जर सरकारला निर्यातबंदी करायची होती, त्याबाबत आधी कळविणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने मोठा फटका सहन करावा लागणार असल्याची भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे तीन ते चार दिवसांपासून खरेदी केलेला कांदा विक्रीसाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. (Nashik Onion)

गेल्या पंधरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी तीन ते साडेचार हजार रुपये दराने कांदा खरेदी केला आहे. हा कांदा विविध देशांसाठी पाठवला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळामुळे उत्तर भारतातील बहुतेक राज्यांत जोरदार पाऊस पडल्याने व्यापाऱ्यांच्या गाड्या रस्त्यातच अडकल्या आहेत. अशातच केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा व्यापाऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. बैठकीत सुरेश पारख, संदेश बाफना, मुन्ना आहेर, संदीप लुणावत, हेमंत बोरसे, अतुल शाह, संतोष अट्टल, मनीष बोरा, प्रवीण कदम, रमेश मेतकर, सुरेश झाल्टे, प्रवीण हेडा, पारस डुंगरवाल, मोनू अग्रवाल, विजय हेडा, सचिन कोतवाल, सुशील पलोड आदी व्यापारी सहभागी झाले होते.  (Nashik Onion)

कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे कांदा लिलाव बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी अलर्ट करणे आवश्यक होते. यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

– खंडू देवरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT