एस. टी. बँकेतील 12 संचालकांचे बंड | पुढारी

एस. टी. बँकेतील 12 संचालकांचे बंड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील एसटी कर्मचार्‍यांची स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेशी गुणरत्न सदावर्ते यांचा काहीच संबंध नाही. त्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या नेतृत्वाविरोधात 12 संचालकांनी बंड केले आहे. आपले मेहुणे सौरभ पाटील यांची बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियमबाह्य निवड केली आहे; तर 38 कर्मचार्‍यांची चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आहे. बँकेच्या हिताविरोधातील ठराव रद्द करण्यासाठी बंडखोर संचालक पुढील काळात सक्रिय असतील, अशी माहिती संचालकांचे प्रवक्ते व एस. टी. कष्टकरी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

शिंदे म्हणाले, बँकेत सदावर्ते कोणत्याही पदावर नाहीत. त्यांची पत्नी जयश्री पाटील एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या जनसंघाच्या नेतृत्वाखाली पॅनेलची निवडणुकीत सत्ता आली आहे. म्हणून सदावर्ते बँकेच्या कारभारात लुडबूड करीत आहेत. त्यांच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे व जातीय द्वेषाच्या वक्तव्यामुळे 480 कोटींच्या ठेवी ग्राहकांनी काढून घेतल्या. त्यामुळे बँकेचा सीडी रेशो बिघडला आहे. त्यामुळे बँक अडचणीत आली असून 12 संचालकांनी त्यांचे नेतृत्व झुगारले आहे. बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एसटीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे 12 संचालकांकडून बँकेतील पदाधिकारी बदलाचा विषय नाही. मात्र बँकेच्या पुढील कारभारात बंड केलेले संचालक चुकीचे ठराव रद्द करतील, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या नेतृत्वात राहण्यासाठी बँकेचे कोल्हापुरातील संचालक संजय घाटगे यांना सदावर्ते यांच्याकडून महागडी गाडी भेट दिल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्याबरोबरच्या संचालकांना चारचाकी वाहने दिली आहेत. सदावर्तेंच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे मराठा, धनगरसह अन्य जातींमध्ये तेढ निर्माण झाला आहे. बँकेची परिस्थिती येत्या काही दिवसांत सुधारली नाही तर रिझर्व्ह बँकेकडून कारवाई होण्याचा धोका असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Back to top button