Latest

Nashik News : तीन हप्तेखोर पोलिस निलंबित, पोलिस अधीक्षकांची कारवाई

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; बेकायदेशीरपणे दारूविक्री करणार्‍यावर कारवाई न करता हप्ता घेणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या महाशयांनी पोलिसपाटील यांच्या फोन पेवरून दोन हजारांचा हप्ता घेतल्याचा सक्षम पुरावा प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ही कारवाई केली. सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्यात हे तिघेही कार्यरत होते. (Nashik News)

निलंबन केलेल्यांमध्ये पोलिस नाईक देवीदास माळी, पोलिस हवालदार शैलेश शेलार, भास्कर जाधव यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिसपाटील आदिनाथ कुदनर यांच्या फोन पेद्वारे पैसे घेतल्याने त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार, रविवारी (दि. ८) नाशिक जिल्ह्यात ३२ ठिकाणी अवैधरीत्या गावठी दारू विक्री करणार्‍यांवर कारवाई करत सुमारे आठ लाख, नऊ हजार रुपये किमतीचे घातक रसायन जप्त करण्यात आले होते. वावी पोलिस ठाणे हद्दीत असणार्‍या मलढोण शिवारामध्ये बेकायदेशीर दारूविक्री होत असल्याची माहिती वावी पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई न करता हप्ता घेतल्याची बाब समोर आल्याने, पोलिस अधीक्षकांनी हप्तेखोर पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून केला जात आहे. (Nashik News)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT