Latest

Nashik News : ‘त्या’ घटनेनंतर शहाणे, तिदमे, खैरे यांना पोलिस संरक्षण

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सिडकोतील भाजप व शिवसेना शिंदे गटातील दोन माजी नगरसेवकांसह समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यास पोलिस संरक्षण पुरवण्यात आल्याचे समोर आले आहे. सिडकोत काही दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगाराने केलेला गोळीबार, राजकीय घडामोंडीमुळे अस्थिरता आल्याने दोघांना पोलिस सरंक्षण दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

भाजपचे मुकेश शहाणे व शिंदे गटातील प्रविण तिदमे व समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे यांना पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. जीवास धोका असल्याचे अर्ज पोलिसांना दिल्यानंतर तिघांच्याही सुरक्षेत वाढ केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेने पोलिस बंदोबस्त पुरवला आहे. दरम्यान, १४ डिसेंबरला मध्यरात्री पवननगर चौक येथे सराईत गुन्हेगार रोहित गोविंद माले उर्फ डिंगम याने अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पोलिस तपासात उघड झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहे. मात्र या गुन्ह्याशी राजकीय व्यक्ती संबंधित असल्याची चर्चा सिडकोत रंगली आहे.

दरम्यान, शहाने व तिदमे हे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी गेल्याचे समजते. तेथून परतल्यानंतर त्यांनी पोलिसांची भेट घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानंतर दोघांच्या सुरक्षेसाठी एक-एक पोलिस तैनात करण्यात आला आहे. तर खैरे यांच्यासाठी दोन पोलिस अंमलदारांची सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, एका माजी नगरसेवकाविरोधात गुन्हेगारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षा न देण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र तरीदेखील तिघांना पोलिस बंदोबस्त मिळाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT