तडका : किती ही जोखीम..! | पुढारी

तडका : किती ही जोखीम..!

राज्याच्या सर्व भागांत धुमाकूळ घालणार्‍या दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. एक म्हणजे बिबटे आणि दुसरे म्हणजे वाळूची चोरी करणारे. बिबट्यांच्या बद्दल बोलायचे, तर महाराष्ट्राच्या नागरी भागात साधारणतः सहा हजार बिबटे मुक्त संचार करत असावेत, असा अंदाज बांधला जातो. साहजिकच राज्यभर कुठे ना कुठेतरी बिबट्याने मानवावर हल्ला केल्याच्या बातम्या येत असतात. तसाच काहीसा प्रकार वाळूची चोरी करणारे तस्कर करत असतात. जळगाव जिल्ह्यातील एका महसूल अधिकार्‍यांवर वाळूची चोरी करणार्‍यांनी थेट हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. सदरील अधिकारी महोदयांना वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे असे आपल्या प्रवासादरम्यान दिसून आले. त्यांनी तत्काळ तलाठी महोदयांना याची माहिती दिली. तलाठी महोदय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाळूच्या ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला. देवाने निर्माण केलेली वाळू सरकार आपल्याला घेऊ देत नाही याचा राग आल्यामुळे संबंधित ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर थेट अधिकार्‍यांच्या गाडीवर घातले. सहकुटुंब प्रवास करणारे अधिकारी थोडक्यात बचावले; पण त्यांच्या वाहनाचे नुकसान झालेच.

राज्यभरात सर्वत्र लहान-मोठ्या नद्या आहेत. संगमापासून निघालेले दगड लहान होत होत त्याची वाळू होते आणि मग या नदीकाठच्या वाळूवर कोणाचा अधिकार आहे, हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात, यावर शासनाचा अधिकार आहे हे निश्चितच आहे; पण सरकारी मालकीचे म्हणजे कोणाच्याही मालकीचे किंवा सार्वजनिक मालकीची असलेली वस्तू आपलीच आहे, असा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा विचार असतो. त्यामुळे ते काही ना काहीतरी मार्ग काढून वाळूची चोरी करत असतात. नदीकाठी ट्रक किंवा ट्रॅक्टर जाऊ नये म्हणून शासनाने मोठे मोठे खड्डे तयार केले तेव्हा या वाळू माफियांनी रात्री गाढवांच्या पाठीवर वाळूच्या गोण्या लादून त्या रोडपर्यंत आणल्या आणि तिथून ते ट्रकमधून राजरोस वाळू पळवण्याचा उद्योग करू लागले. प्रशासकीय यंत्रणा या गोष्टीवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत असते. लाखो रुपयांची फुकटची वाळू विकून करोडो रुपये कमावणारे लोक असा काही विरोध झाला की, माथेफिरू होतात आणि शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ला करतात. पूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये एका उपजिल्हाधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीला चक्क रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता.

तहसीलदार, तलाठी यांच्या अंगावर गाडी घालण्याचे नित्याचे झाले आहे. एवढी जोखीम पत्करून शासकीय नोकरी लोक तरी कसे करतील? नदी काठावर पोलिसांच्या ड्युटी लावायच्या म्हटले, तर एवढा मोठा लांबलचक नदीकाठ असतो की, किती पोलिस कुठे आणि कसे ठेवणार, हा प्रश्न उभा राहतो. शिवाय पोलिसांवर हल्ला होणार नाही, याची काही खात्री नाही. शेवटी पोलीस काय किंवा शासकीय कर्मचारी काय, हा गणवेशाच्या आतील एक माणूसच असतो.

संबंधित बातम्या

वाळू उपसा करणारे चोर काही समाज कार्य करीत आहेत की काय, असा संशय घेण्यास जागा आहे. म्हणजे नदीपात्रातील वाळू काढली, तर पात्र मोठे होत राहील. त्यामुळे पावसाळ्यात नदीला येणारे पाणी दीर्घकाळपर्यंत साठून राहील, हा त्यांचा चांगला उद्देश असावा; पण बहुधा तो शासनाच्या लक्षात येत नसावा. परवाना नसणारे चोरून वाळू काढतात; परंतु हे सगळे लोक विकासाला हातभार लावत आहेत, हे नक्की!

–  बोलबच्चन

Back to top button