नाशिक : पुढारी ऑनलाइन
नाशिकमध्ये अनेक विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहे. तसेच काही अपूर्ण अवस्थेत आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक विकासाची कामे येण्याची आवश्यकता आहे. मात्र नाशिकवर नेहमीच अन्याय होत असून नाशिकवर होणारा हा अन्याय शासनाने दूर करावा अशी प्रमुख मागणी करत नाशिकच्या उद्योग, पर्यावरण, पाणी पुरवठा, शहर विकास, वाहतूक यासह अनेक प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नियम २९३ अन्वये नाशिकच्या प्रश्नांबाबत मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करतांना शासनाचे लक्ष वेधले.
ते म्हणाले की, जगात वेगाने विस्तारणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश होतो. मुंबई नंतर नागपुर व पुणे येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू होत आहेत. मात्र नाशिक शहरात मेट्रो रेल्वे सुरु करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई केली जात आहे. खरं तर नाशिक शहर आणि शहराला लागू असलेल्या त्र्यंबकेश्वर, गोंदे एमआयडीसी, भगूर, सिन्नर, ओझर, दिंडोरी या परिसरातील शहरांना जोडणारी मेट्रो किंवा रॅपिड रेल्वे केली जावी अशी आमची मागणी होती. नाशिक शहराचा झपाट्याने होत असलेला विकास, परिसरातील भागाचे होत असलेले शहरीकरण आणि आगामी वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात दळणवळणाची साधने अपुरी पडणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासाठी लवकरात लवकर मेट्रो, रॅपिड रेल प्रकल्पाचे काम सुरु होणे आवश्यक आहे. मात्र नाशिकरांच्या गळ्यामध्ये निओ मेट्रो मारली जात आहे अशी टीका त्यांनी केली.
आता काम सुरु झाले तर आगामी ३/४ वर्षात मेट्रो साकारली जावू शकते. मात्र याबाबत नाशिक या मेट्रोपॉलीटीन सिटीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. लुधियाना, चंदीगड, भोपाळ, जयपुर सारख्या शहरात मेट्रो प्रकल्प राबवण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्या तुलनेत नाशिकचा विस्तार अधिक आहे. तरी नाशिक शहरातली मेट्रो प्रकल्पास लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी राज्य शासनाकडे केंद्र सरकार कडे पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा :