पुणे : शेतीपयोगी साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : शेतीपयोगी साहित्याची चोरी करणारी टोळी जेरबंद

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बोअर मोटार, मल्चिंग पेपर असे शेतीपयोगी साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद करून 11 लाख 50 हजारांचा माल हस्तगत केला. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. सुभाष भोराजी दुधवडे (वय 27), गजानन धावजी दुधवडे (वय 47, दोघे रा. पारदरा वारणवाडी पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), अजय रंगनाथ वाघ (वय 26, रा. गुरेवाडी म्हसोबा झाप, ता. पारनेर, जि. अहमदनगर), सोन्याबापू गेणभाऊ मधे (वय 23) आणि भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे (वय 28, रा खंदरमाळ माळवदवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीत पाणबुडी मोटार, बोअर मोटार, मल्चिंग पेपर इत्यादी शेतीपयोगी साहित्याची दोन दुकाने फोडून चोरी केल्याच्या घटना मागील महिन्यात घडल्या होत्या. त्याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः लक्ष देऊन हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत जुन्नर विभागात काम करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, पोलिस नाईक संदीप वारे, पोलिस जवान अक्षय नवले, दगडू वीरकर, अक्षय सुपे यांना योग्य मार्गदर्शन तसेच तांत्रिक तपास तंत्राबाबत योग्य सूचना करून कारवाईचे आदेश दिले.

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या जुन्नर विभागाचे तपास पथकाने समांतर तपास चालू केला. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरील पाच जणांना त्यांचेकडील पिकअप गाडी (एमएच 12 एफडी 9849) व बोलेरो (एमएच 14 डीए 2065) या वाहनांसह ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मल्चिंग पेपर, बोअर मोटार, पाणबुडी मोटार, शेती पंप असा माल तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली पिकअप व बोलेरो असा एकूण साडेअकरा लाख रुपये किमतीचा माल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाई

Back to top button