Latest

Nashik Navratri festival : नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात डीजे, लेझरवर निर्बंध ; ‘त्या’ प्रकारानंतर निर्णय…

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना ह्दयाचा झालेला त्रास, तसेच अप्रमाणित लेझरमुळे अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाल्याने नवरात्रोत्सवात डीजे आणि लेझरवर पोलिस आयुक्तालयाने निर्बंध घातले आहेत. लेझर व डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. (Nashik Navratri festival)

संबधित बातम्या :

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकारी व डीजेचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अप्रमाणित शक्तिशाली लेझरमुळे अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेचा दणदणाट व लेझरचा झगमगाट करत पोलिसांच्या आदेशाला पायदळी तुडवले. मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे पालनही झाले नाही. कर्कश आवाजामुळे अनेक ज्येष्ठांना हृदयाचा त्रास झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनी डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजेचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. (Nashik Navratri festival)

दरम्यान, मिरवणूक झाल्यानंतर काही युवकांना दिसण्यास त्रास जाणवू लागला. तसेच डोळ्यांत रक्त साचल्याचे दृष्टिदोष निर्माण झाले आहेत. तपासणीनंतर मिरवणुकीतील लेझरमुळे डोळ्यांना गंभीर इजा झाल्याने आरोग्य यंत्रणेने सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला असून, पोलिसांनीही त्याची गंभीर दखल घेतली आहे. गरबा मंडळांना यंदा अजिबात लेझर उपकरणे वापरता येणार नाही.  (Nashik Navratri festival)

दहा दिवसांनी सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात गरबा व दांडिया आयोजित करणाऱ्या मंडळांना डीजे लावण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. साउंड सिस्टिमचा वापर मर्यादित आवाजात करण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहेत. लेझर व डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आयोजकांना पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहे. तसेच नवरात्रोत्सव आणि नियमांसंदर्भात पोलिस आयुक्तालयात बैठक होण्याची शक्यता आहे.

पोलिसांचे भरारी पथक

नवरात्रोत्सवात सामाजिक मंडळे, संस्था दांडिया, गरब्याचे आयोजन करतात. शहरातील मैदाने, हॉटेल, लॉन्सवर याचे आयोजन केले जाते. गरबाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी आयोजकांच्या वतीने डीजे व लेझरचा वापर केला जातो. त्यामुळे यंदाचा उत्सव उत्साहात व निर्विघ्न साजरा करण्यासाठी पोलिसांनी मंडळांना अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांची भरारी पथके मंडळांना भेटी देत पाहणी करणार आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT