Latest

नाशिक : आरक्षणासाठी खा. संभाजीराजे, ना. भुजबळ एकत्र

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा, ओबीसी आरक्षण असा वाद अजिबात नाही. काही लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे खा. संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केले. त्यास पुष्टी म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मराठा नेत्यांनी विरोध केला नसल्याचे सांगत निवडणुका आल्या की वाद निर्माण होत असल्याचे नमूद केले.

नाशिक येथे सोमवारी (दि. 4) खा. संभाजीराजे यांनी भुजबळ फार्म येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्याप्रसंगी या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणसंदर्भात मुंबई येथे आझाद मैदान येथील मूक आंदोलनाला भुजबळ आले होते. तेव्हाच आपण नाशिकला येण्याचे कबूल केले होते, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. येत्या 6 मे रोजी शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी आहे. शाहू महाराज यांचे नाशिकशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पहिले आरक्षण शाहू महाराज यांनी दिले होते. शाहू महाराज यांच्या शताब्दीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज घराघरांत पोहोचवत असल्याचे सांगत भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे वंशज असल्याचे गौरवोद्गार संभाजीराजे यांनी काढले. राष्ट्रवादीतर्फे शाहू महाराज स्मृती शताब्दी साजरी करणार असल्याचे ना. भुजबळ यांनी सांगितले.

आरक्षणाबाबत 2 मेनंतर भूमिका मांडणार..
सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, माझी टर्म येत्या 2 मेपर्यंत आहे. तोपर्यंत आपण कुठेलही राजकीय भाष्य करणार नाही, असे सांगत 2 मेनंतर बोलू. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, छत्रपतींचा वंशज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे, तर सर्वांशीच माझी जवळीक असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण राज्य सरकारमुळे गेले, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावरही बोलणे त्यांनी टाळत 2 मेनंतर भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे 2 मेनंतर ते काय भूमिका मांडणार वा पवित्रा घेणार, याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT