Latest

Nashik Fog News | धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; उत्तर भारतामधून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा परिणाम नाशिकच्या हवामानवर होताना दिसून येत आहे. नाशिक शहर व परिसर शुक्रवारी (दि.५) पहाटे धुक्यात हरवून गेला. त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान असल्याने थंडीचा वेग मंदावला. दरम्यान, पुढचे तीन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्राती ल काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. (Nashik Fog News)

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हवामान बदलातील सातत्य कायम आहे. तीन दिवसांपासून पहाटे शहरावर धुक्याची चादर पसरत आहे. धुक्याचा प्रभाव सकाळपर्यंत कायम राहत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत आहे. धुक्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा झोत काहीसा मंदावला आहे. परिणामी थंडीचा जोर ओसरला आहे. पहाटेच्या वेळी धुक्यात फिरण्याचा आनंद नाशिककर घेत आहेत. शहरात किमान तापमानाचा पारा १२.८ अंश सेल्सियस इतका नोंदविण्यात आला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हवामान बदलाचा फटका बसतो आहे. निफाडला धुके आणि पहाटेच्या वेळी वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे द्राक्षबागा धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर गहु-हरभऱ्यासाठी हे वातावरण पोषक समजले जाते. अन्य तालूक्यांमध्येही जीवनमानावर हवामानातील बदलाचा परिणाम होत आहे.

पावसाचा अंदाज

मध्य भारतावर सध्या दोन विविध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो आहे. हरियाणाच्या वरील पश्चिमी प्रकोप प्रणाली असून ती हवेच्या वरच्या थरात चक्रीय वात स्थिती रूपात आहे. तसेच उत्तर प्रदेशाच्या नैर्ऋत्येला चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या मध्यपासून ते उत्तरप्रदेश पर्यंत चक्रीय स्थितीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडून येणारा वाऱ्या सोबत आर्द्रताही पाहायला मिळते आहे. यासर्व परिस्थितीमुळे मध्य भारतावर अवकाळी पावसाचे संकट ऊभे ठाकले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, नंदूरबारसह मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा ;

SCROLL FOR NEXT