कानाचे आजार वाढले; मात्र तज्ज्ञांची वानवा | पुढारी

कानाचे आजार वाढले; मात्र तज्ज्ञांची वानवा

एकनाथ नाईक

कोल्हापूर : कुणी कुणाशी काही बोलायचे नाही. शाळा-महाविद्यालयांतून सुटल्यानंतर, कामावरून घरी परतताना, इतकेच नव्हे तर घरात सतत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकण्याचे अनेकांना फॅड आहे. दिवसभरात आठ तासांपेक्षा अधिक काळ हेडफोन वापर केल्यामुळे नागरिकांमध्ये बहिरेपणा वाढत आहे. इतकेच काय, कानाच्या संसर्गाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याने ओपीडीमध्ये गर्दी वाढल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. कोल्हापूर शहरात 35 तर जिल्ह्यात 20 असे एकूण 55 कान, नाक, घसातज्ज्ञ आहेत.

सीपीआरच्या नाक, कान, घसा विभागाकडे दररोज 70 ते 90 रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. यामध्ये हेडफोनचा अतिरेकी वापर केल्यामुळे कानावर गंभीर परिणाम झाल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. हेडफोनच्या अतिवापरामुळेच ऐकू येत नसल्याचे अनेक रुग्ण सांगतात. सध्या कानाला हेडफोन लावून बोलण्याचे जे फॅड नागरिकांमध्ये पसरले आहे, त्याचे अनुकरण लहान मुले करताना दिसून येत आहेत. या सगळ्याचा गंभीर परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असून पालकांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजचे आहे.

सातत्याने कानाला हेडफोड लावून बोलण्याच्या सवयीचे गंभीर पडसाद आता तरूणांच्या आरोग्यावर उमटू लागले आहेत. दिवसभर काम करताना, कामावरून घरी परतताना, प्रवासात असताना सामारंभात सहभागी होताना, इतकेच नव्हे तर जेवतानादेखील अनेकांच्या कानात हेडफोन असतोच. हेडफोनच्या सततच्या वापरामुळेच बहिरेपणाचा धोका वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलेतन जिल्ह्यात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे वास्तव आहे.

Back to top button