रेशन दुकानदारांचा 16 रोजी दिल्लीत धडक मोर्चा | पुढारी

रेशन दुकानदारांचा 16 रोजी दिल्लीत धडक मोर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक रेशन दुकानात 4-जी ई पॉस मशिन द्यावे, 300 रुपये मार्जिन मनी मिळावा, मासिक इन्कम गॅरंटी 50 हजार रुपये इतकी मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा देशव्यापी संप सुरूच आहे. या संपाची तीव्रता वाढविण्यासाठी कोल्हापुरात शुक्रवारी दसरा चौकात निदर्शने करत आक्रोश केला. यावेळी रेशन बचाव संघटनेचे राज्य सचिव चंद्रकात यादव व जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी प्रश्न सुटले नाहीत तर लढा तीव्र केला जाईल. 16 जानेवारीला दिल्लीत धडक मारली जाईल, असा इशारा दिला आहे.

रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी एक जानेवारीपासून बेमुदत संप सुरू आहे. सरकारचा नाकर्तेपणा रेशन दुकानदारांच्या मुळावर आला आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकारच्या विरोधात लढा तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने शहरात शुक्रवारी निदर्शने केली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी चंद्रकांत यादव यांनी सरकारच्या रेशनविरोधी धोरणावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, रेशन दुकानदारंचे प्रश्न त्वरित सोडवा. अन्यथा मोठा संघर्ष उभा करू. रवी मोरे यांनी रेशन व्यवस्थेत सुधारणा करावी, दुकानदारांना वार्‍यावर सोडू नये, अशी मागणी यावेळी केली.

यावेळी विजय देवणे, श्रीपतराव पाटील, राजन पाटील, संजय यशादे, गजानन हवालदार, राजेश मंडलिक, पांडुरंग सुभेदार, आबू बारगीर, आनंदा लाहे, राजन पाटील आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या…

यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 च्या लाभार्थ्यांचे निकष त्वरित बदलावेत. मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त विभागातील 14 जिल्ह्यांतील एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना त्वरित धान्य द्यावे, आनंदाचा शिधा योजना कायमपणे राबवावी, पाम तेलाऐवजी सूर्यफूल, सोयाबीन तेल द्यावे. ज्वारी, बाजरी, वरई, मका, राजगीरा रेशनमध्ये समाविष्ट करावा आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

Back to top button