Latest

Nashik Dengue Update : डेंग्यू निर्मूलनासाठी 1 लाख 68 हजार घरांची तपासणी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत असल्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. डेंग्यू बाधितांचा आकडा हजाराच्या घरात पोहोचल्याने मलेरिया विभागाने डेंग्यू निमूर्लनाच्या मोहिमेला वेग दिला आहे. गेल्या महिनाभरात मलेरिया विभागाच्या पथकांनी शहरातील एक लाख ६८ हजार ५९२ घरांना भेटी देत तपासणी केली आहे. या तपासणीत डासांच्या अळ्या आढळलेल्या घरांमधील नागरीकांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. (Nashik Dengue Update)

शहरात पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तब्बल १९३ डेंग्यू बाधितांची नोंद झाली होती. तर डेंग्यूच्या तीन संशयीत रुग्णांचा मृत्यु झाला होता. कर्मयोगी नगरमधील एका संशयिताचा २२ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर यापाठोपाठ २४ ऑक्टोबर रोजी आणखी एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरचा डेंग्यू संशयित आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर नाशिकरोड येथील आनंदनगर परिसरातील एका व्यावसायिकाचाही डेंग्यूच्या संशयाने मृत्यू झाला होता. या तिघांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात आनंदनगर मधील व्यावसायिकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर उर्वरीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. शहरात डेंग्यू कमी होण्याऐवजी डेंग्यूचा उद्रेक अधिकच वाढला आहे. गेल्या २८ दिवसात शहरात तब्बल २७२ डेंग्यूच्या नवीन रुग्णांची भर पडल्याने वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. जवळपास दीड हजार डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आले आहेत. (Nashik Dengue Update)

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये प्रादुर्भाव अधिक

शहरात डेंग्यूचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने शहरात घरभेटी वाढविल्याचा दावा केला आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्येच डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. या वस्त्यांमधील घरांमध्ये फ्रिज, फुलदानी, कुंड्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे.त्यामुळे शहरातील धूरफवारणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

डेंग्यूचे महिनानिहाय रुग्णसंख्या (Nashik Dengue Update)

जानेवारी- १७

फेब्रुवारी- २८

मार्च- २८

एप्रिल- ८

मे- ९

जून- १३

जुलै – ३२

ऑगस्ट – ४७

सप्टेंबर – २६१

ऑक्टोबर – १९३

नोव्हेंबर – २७२

डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत मलेरिया विभागातर्फे घरोघरी तपासणी केली जात आहे. शहरातील प्रामुख्याने उच्चभ्रू वस्त्यांमधील घरांमध्ये डेंग्यू आजार फैलावणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे. संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख, मनपा

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT