Shiv Sena MLA disqualification hearing | आमदार अपात्रता सुनावणी : भाजपसोबतची युती नैतिक, तात्त्विक फायद्याची | पुढारी

Shiv Sena MLA disqualification hearing | आमदार अपात्रता सुनावणी : भाजपसोबतची युती नैतिक, तात्त्विक फायद्याची

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील बुधवारची सुनावणी शिवसेनेची भाजपसोबतची युती तसेच महाविकास आघाडीच्या निमित्ताने काँग्रेससोबत जाण्याच्या मुद्यावरील प्रश्नांनी संपली. भाजपसोबतची युती ही पक्षहिताची होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉग्रेससोबत जाणे हे बेकायदेशीर आणि मतदारांचा विश्वासघात करणारी होती, हा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा दावा साफ खोटा असल्याचे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. तर एकनाथ शिंदे यांना संभाव्य कायदेशीर पेच लक्षात घेत इंग्रजी भाषेत पाठविलेले पत्र व्हॉटस्अॅप केले की ई- मेल पाठविला, यावरून सुनावणीत चांगलाच खल झाला. (Shiv Sena MLA disqualification hearing)

पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्राची भाषा, तसेच हे पत्र ई- मेल की व्हॉटस्अॅप वर पाठविले या प्रश्नांनी जेठमलानी यांनी बुधवारी सुनील प्रभू यांना उलटतपासणीत भंडावून सोडले. यामुळे सुनील प्रभू यांना सुनावणीदरम्यान आपली साक्ष बदलावी लागली. एकनाथ शिंदे यांना २२ जून २०२२ रोजीचे पाठविलेले पत्र कोणत्या माध्यमातून दिले, या प्रश्नावर दीड वर्षापूर्वीचे मला आठवत नाही; पण व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून दिले, असे उत्तर प्रभू यांनी सुरुवातीला दिले, त्यावर, व्हॉटस्अॅप मेसेज
सादर करू शकता का, या प्रश्नावर प्रभू यांनी नेमके सांगू शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच, उद्याच्या सुनावणीत ते सादर करण्याचा प्रयत्न करतो असे उत्तर प्रभू यांनी दिले. मात्र, जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांना २२ जूनचे पत्र हे ई-मेलद्वारे पाठवले होते, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. याबाबत कार्यालयीन कर्मचारी विजय जोशी यांनी खातरजमा केली आहे. त्यामुळे पटलावर सत्य यावे यासाठी साक्ष बदलण्यात यावी अशी विनंती प्रभू यांनी अध्यक्षांना केली, त्याचप्रमाणे सुनावणी संपण्याआधी ठाकरे गटाकडून ई-मेलची प्रत अध्यक्षांना सादर करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांना पाठविलेले पत्र इंग्रजीत का लिहिले यावरूनही शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्याला, भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून इंग्रजीत लिहिल्याचे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले. त्यावर, जेठमलानी यांनी कायदेशीर पेच उद्भवू शकतो, असे का वाटले, असा प्रतिप्रश्न केला. यापूर्वी विधिमंडळात असे पेच निर्माण झाले त्यावेळी ते पेच न्यायालयात गेले आणि दाद मागितली गेली. हा पूर्व इतिहास होता म्हणून मला कायदेशीर पेच उद्भवेल वाटल्याचे उत्तर प्रभू यांनी दिले. युती आघाडीची नैतिकता शिवसेनेची भाजपसोबतची युती पक्षाच्या हितासाठी नैतिक आणि तात्त्विक फायद्यासाठी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतची महाविकास आघाडी ही बेकायदेशीर व मतदारांचा विश्वासघात करणारी होती, असे शिंदेंसोबतच्या आमदारांचे म्हणणे होते, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला, त्यावर हे खोटे असल्याचे उत्तर ठाकरे गटाकडून प्रभू यांनी दिले. तसेच, एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांना संघटनात्मक पदावरून काढण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नसल्याचा जेठमलानी यांचा दावा खोटा असल्याचेही प्रभू म्हणाले.

MLA Disqualified Hearing | जेठमलानींचा प्रचार आणि प्रभूच्या घोषणा

आमदारांना ई-मेलवरून पत्र आणि व्हिप पाठविण्याच्या पद्धतीवरून वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना भंडावून सोडले. मात्र, पद्धती, प्रथेवरून सुरू असलेल्या प्रश्नांवर प्रभू यांनी थेट जेठमलानी यांच्या निवडणूक प्रचाराची आठवण सांगितली तेव्हा उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. ‘मला सगळ्या पद्धती माहिती आहेत. तुमचा वांद्रे येथील प्रचार मी केला होता. तेव्हा घोषणा देण्यासाठी मी पुढे होतो. ‘जेठमलानी साहेब आगे बढ़ो’ म्हणत मी तुमचा प्रचार केला आहे. तर, अनिल परब हे तुमचे प्रचार प्रमुख होते, अशी आठवण सांगत प्रभू यांनी जेठमलानी यांना कोपरखळी मारली. त्यावर, ‘हो, मला माहिती आहे, तेव्हा युती होती’ अशी पुस्ती जेठमलानी यांनी जोडली, त्यावर, विधानसभा अध्यक्षांनी त्यामुळे तर सोपे प्रश्न विचारले जात नाहीत ना?’ अशी टिपणी केली आणि सुनावणीदरम्यान एकच हास्यकल्लोळ उडाला.

आता शिंदे गटाची उलट तपासणी

विधानसभा अध्यक्षांसमोरील ठाकरे गटाची उलट तपासणी गुरुवारी संपणार आहे. त्यानंतर शिंदे गटाची उलट तपासणी सुरू होईल. डिसेंबर महिन्यात १.२, ७ आणि ८ तारखेला शिंदे गटाची उलट तपासणी असेल. तसेच, याप्रकरणी ११ ते २० डिसेंबर या कालावधीत नागपुरात अंतिम सुनावणीची कार्यवाही पार पडेल. शिवाय, आवश्यकता भासल्यास २१ आणि २२ डिसेंबर हे अधिकचे दोन दिवस सुनावणीसाठी दिले जाण्याची शक्यता आहे. (Shiv Sena MLA disqualification hearing)

हेही वाचा 

Back to top button