Latest

Nashik Crime : बॉम्बची अफवा पसरवणारा ताब्यात

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई नाका परिसरात दाेन ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याचा फाेन पाेलिसांच्या ११२ हेल्पलाइनवर आल्याने शुक्रवारी (दि. २७) चांगलीच खळबळ उडाली होती. हे गांभीर्याने घेऊन मुंबई नाका पाेलिसांनी एक तासाच्या आत तपास करून बाॅम्बची मााहिती फाेनवरून देणाऱ्या 20 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. चौकशीत हा युवक मनोरुग्ण असल्याचे समोर येत असून, तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकाेले येथील रहिवासी आहे.

शुक्रवारी सायंकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास ११२ हेल्पलाइनवर एका व्यक्तीने फाेन करीत मुंबई नाका परिसरातील एक गॅरेज व इंग्लिश लर्निंग सेंटरजवळ कुणीतरी बाॅम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. या फाेनमुळे पाेलिस यंत्रणा सतर्क झाली. मुंबई नाक्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील राेहाेकले यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, तेथे संशयास्पद काहीच आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी ११२ वर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी २० वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चाैकशी करता, ताे मनाेरुग्ण असल्याचे आढळले. त्याने स्वत:च्याच माेबाइलवरून बॉम्बची माहिती देणारा फाेन केल्याचे पाेलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, ताे सात दिवसांपासून पळून गेल्याचे नातलगांनी सांगितले. नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला फाेन केला असता, ताे पंढरपूर, सांगली या ठिकाणी असल्याचे सांगून फाेन कट करत असल्याचे समोर आले आहे. मानसाेपचार तज्ज्ञांमार्फत त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहितीही नातलगांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, युवकाचा ताबा पालकांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT