अर्थव्यवस्थेचा कणा | पुढारी

अर्थव्यवस्थेचा कणा

जगन : का रे मगन, फार टेन्शनमध्ये दिसत आहेस? चेहरा कशामुळे एवढा पाडून घेतला आहेस?
मगन : अरे काय नाय रे. बजेट जवळ आले की, मला फार टेन्शन येतं. काय महाग होईल, काय स्वस्त होईल काही कळत नाही.
जगन : तुझ्या खिशात खडकू नसतो. माझीच पाच हजार रुपये उधारी तीन वर्षं झाले फेडतो आहेस, तुला कशाचं बजेटशी घेणं-देणं? बजेट येत राहतात – जात राहतात, आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे?
मगन : असं कसं म्हणतोस?फरक पडत असतो. देशाचं अर्थकारण कोण सांभाळतो माहिती आहे का तुला?
जगन : अरे कोण म्हणजे? मोठे मोठे अर्थतज्ज्ञ असतात. ते वर्षभर काम करत असतात, अभ्यास करत असतात, संशोधन करत असतात, जागतिक परिस्थितीचा विचार करत असतात. त्यांच्यासोबत देशाचे अर्थमंत्री, पंतप्रधान हे सर्व देशाचा आर्थिक कारभार सांभाळत असतात.
मगन : नाही, तसं नाही. देशाचं अर्थकारण सांभाळणारे मुख्यत: तीन प्रकारचे लोक आहेत. पहिले म्हणजे थुंके, दुसरे म्हणजे फुंके आणि तिसरे म्हणजे ओक्के.
जगन : काय म्हणालास काही समजलं नाही.
मगन : नीट समजून घे. थुंके, फुंके आणि ओके हे तीन प्रकारचे लोक देशाच्या अर्थचक्राला गतिमान ठेवत असतात. हे लोक कोण आहेत ते समजून घे. बजेटमध्ये ज्यावर टॅक्स वाढणार आहे म्हणजे ज्याच्या किमती वाढणार आहेत त्या गोष्टी प्रामुख्याने तीन आहेत आणि या तीन गोष्टींचा उपभोग घेणारे हेच देशाचं अर्थकारण सांभाळतात. म्हणजे बघ, मुख्य म्हणजे बिडी सिगरेट फुंकणारे हे झाले फुंके. कधी काळी दोन रुपयाला असलेली सिगरेट आज वीस रुपयाची झाली, कोणी काही तक्रार केली? मोर्चे निघाले, निदर्शने झाली? अजिबात म्हणजे नाही. म्हणजे फुंके हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो अर्थकारण सांभाळत असतो.
दुसर्‍या प्रकारचे लोक म्हणजे थुंके. हे थुंकत असतात तंबाखू खाऊन. तुम्ही काहीही प्रयत्न करा, त्या तंबाखूच्या पाकिटावर कॅन्सरसारखी भीतीदायक चित्रे टाका, तरीही हे यांचा नाद सोडणार नाहीत. कितीही टॅक्स लावा, यांची तक्रार नाही. कधी कोणी तंबाखूचे भाव कमी करा, त्याच्यावरील कर कमी करा म्हणून काही धरणे धरले किंवा मूक मोर्चा काढल्याचे ऐकले आहेस का? तोंडामध्ये तंबाखूची गोळी असेल तर यांना मूक मोर्चाच काढावा लागेल हा भाग वेगळा. पण यांचे सगळे काही विनातक्रार.

मगन : तिसर्‍या प्रकारचे लोक हे अर्थकारणाचा महत्वाचा भाग आहेत. हे म्हणजे ओके लोक. म्हणजे कार्यक्रम नेहमी ओके करणारे हे म्हणजे दारू पिणारे. प्रत्येक बजेटमध्ये सरकार सगळ्यात खूश कशावर असेल तर या पिण्यामधून मिळणार्‍या टॅक्सवर. तुम्ही किमती कमी करा, जास्त करा, कितीही वाढवा, कितीही टॅक्स लावा यांची काही म्हणजे काही तक्रार नाही. म्हणजे एक प्रकारे जेवढ्या जास्त प्रमाणात हे लोक मद्यसेवन करतील तेवढी देशभक्ती त्यांच्याकडून होत आहे हे तू लक्षात घे.

देशात जी काही विकासकामे चालतात ती प्रामुख्याने याच तिन्ही लोक प्रकारच्या लोकांनी दिलेल्या महसुलामुळे यात मला तरी काही शंका नाही. या लोकांचं कसं होईल यामुळे मला बजेटची चिंता असते. दरवर्षी बजेट जवळ आलं की मला वाटतं, सरकारने या तिन्ही प्रकारच्या लोकांना काहीतरी प्रोत्साहन दिले पाहिजे. शेवटी अर्थकारणाचा जीव आणि प्राण आहेत ही लोक. त्याच्यामुळे मला टेन्शन आहे की या बजेटमध्ये यांच्यासाठी काही तरतूद होणार की नाही?

Back to top button