अनधिकृत माथाडी पोलिसांच्या रडारवर; उद्योग, आयटी कंपन्या, व्यापारी संघटनांनी मांडले गार्‍हाणे | पुढारी

अनधिकृत माथाडी पोलिसांच्या रडारवर; उद्योग, आयटी कंपन्या, व्यापारी संघटनांनी मांडले गार्‍हाणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत माथाडी किंवा माथाडी संघटनांच्या नावे शहरातील औद्योगिक, आयटी कंपन्या तसेच व्यावसायिकांकडून खंडणी उकळणार्‍या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी चार दिवसांपूर्वी आयुक्तालयात याबाबत बैठक बोलावली होती. त्या वेळी कंपन्या, व्यावसायिक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज् अँड अ‍ॅग्रीकल्चर यांचे शंभरपेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील औद्योगिक पट्ट्यात अनधिकृत माथाडी तसेच विविध प्रकारच्या बेकायदेशीर संघटना स्थापन करून गुंडांच्या टोळ्या खंडणी उकळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. व्यावसायिकांनी खंडणी देण्यास नकार दिला तर त्यांच्या कामात या टोळ्यांकडून अडथळा निर्माण करून वेठीस धरले जाते. मालाच्या गाड्या खाली करायच्या असतील तर त्यांना अव्वाच्या सव्वा माथाडी लावली जाते.

एवढेच नाही तर त्यांच्याकडील कामगारांकडूनच गाड्या खाली करून घेण्यास दबाव टाकला जातो. प्रसंगी अनुचित घटना घडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे व्यावसायिक भीतीपोटी त्यांच्या मागण्या पूर्ण करतात. शिवाय, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास देखील धजावत नाहीत. त्यामुळे अशा खंडणीखोर टोळ्यांचे फावते. याचा उद्योगविश्वावर सुद्धा परिणाम होतो, त्यामुळे या सर्व गोष्टींची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे.

गुन्हेगारी टोळ्यांकडून खंडणी वसुली करून, माथाडी कामगारांकडून अवास्तव पैशाची मागणी करून दादागिरी केली जाते. वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते. याला आळा घालवा, माथाडी कामगारांचे मजुरीचे दर ठरवून ते प्रदर्शित करावेत, वाहतुकीबाबत योग्य त्या उपायोजना कराव्यात, अशा सूचना बैठकीतील प्रतिनिधींनी केल्या. त्या वेळी आयुक्त म्हणाले, ’पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाईल.

त्यामुळे तक्रारदारांनी न घाबरता तक्रार करावी. वाहतूक समस्येबाबत कंपन्यांशी संपर्क करून ट्रॅफिक वार्डनची संख्या वाढविण्यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. औद्योगिक, आयटी कंपन्या तसेच व्यापार्‍यांना माथाडी किंवा माथाडी संघटनांच्या नावाखाली कोणी त्रास देऊन खंडणीची मागणी करत असेल तर अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल.

या वेळी उपस्थित प्रतिनिधींना वरिष्ठ अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. बैठकीस सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा, उपायुक्त अमोल झेंडे, विजयकुमार मगर, स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र साळुंके, खंडणीविरोधी विभागाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर उपस्थित होते. एखाद्या वेळी तक्रार करण्याबाबत तक्रारदाराला भीती वाटत असेल तर त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करावी, असे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. तर माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश मते यांनी बैठकीत माथाडी कामगार कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली.

समस्यांबाबत आढावा
गेल्या आठवड्यात पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक वसाहत परिसरात बैठक पार पडली होती. यावेळी कंपन्यांना भेडसावणारे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था, महिला कामगारांच्या अडचणी, वाहतूक समस्या याबाबत आढावा घेण्यात आला होता.

बेकायदेशीर संघटना, माथाडीच्या नावे व्यवसायिकांकडून खंडणी उकळणार्‍यांची पोलिसांनी गंभीर दखल घेण्यास सुरुवात केली आहे. व्यवसायिकांनी न घाबरता तक्रार करावी. पोलिस तत्काळ कारवाई करतील. त्याचबरोबर स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची नजर अशा बेकायदेशीर कृत्यांवर असणार आहे.

                                               – रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

Back to top button