Latest

Nashik Fraud News : मुलीच्या आवाजात बोलायचा, भामट्याने तरुणाला घातला लाखोंचा गंडा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावरून मैत्री करीत मुलीच्या आवाजात संवाद साधून भामट्याने शहरातील तरुणाला आर्थिक गंडा घातला. भामट्याने मुलीच्या आवाजात तरुणाशी फोनवरून संवाद साधत वडील आजारी असल्याचे सांगून पैसे मागितले होते. तसेच तरुणाच्या 'ड्रीमगर्ल'चा भाऊ होऊन भामटा तरुणाला भेटला आणि लाखो रुपये घेतले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. (Nashik Fraud News)

संबधित बातम्या :

मखमलाबाद परिसरातील ३० वर्षीय तरुणाने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित अर्जुन तात्याराव उफाडे (रा. जि. परभणी) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने २०२० साली इन्स्टाग्रामवर ईश्वरी मुंढे नावाच्या अकाउंटधारकाशी मैत्री केली होती. ईश्वरी मुंढे ही मुलगी आहे, असे समजून नाशिकचा तरुण तिच्याशी संपर्कात होता. समोरील व्यक्तीही मुलगी असल्याचे भासवून तरुणाला गप्पांमध्ये गुंतवत होता. त्यातून एकमेकांची मैत्री आणि गप्पा वाढत गेल्या. दरम्यान, ईश्वरी नावाने संवाद साधणाऱ्या अर्जुनने नाशिकच्या तरुणासोबत मोबाइलवरून संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यासाठी अर्जुनने मुलीच्या आवाजात तरुणाशी संवाद साधला. त्यामुळे तरुणाला समोरील व्यक्ती मुलगी असल्याचे वाटले. दरम्यान, मैत्रीवर विश्वास ठेवत तरुणाने त्याच्या ड्रीमगर्ल ईश्वरीला काही वेळेस पैसेही पाठवले. त्यानंतर वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून भामट्याने तरुणाकडे १ लाख ९६ हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे स्वीकारण्यासाठी ईश्वरीचा भाऊ या नात्याने विकास मुंढे नाव धारण करून संशयित अर्जुन नाशिकला तरुणाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आला. त्याने तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने १ लाख ९६ हजार रुपये घेत पुन्हा गावी गेला. दरम्यान, त्यानंतरही अर्जुनने ईश्वरी होऊन तरुणाशी संवाद कायम ठेवला होता. त्यानंतर तरुणाने पैसे परत मागितल्यानंतर त्याला शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने म्हसरूळ पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. या अर्जाचा तपास करून म्हसरूळ पोलिसांनी संशयित उफाडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्ष ओळख नसलेल्या व्यक्तींशी आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.

असा आला जाळ्यात

संशयिताने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून ईश्वरी मुंढे नावाने तरुणाला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. गप्पा मारून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वडिलांच्या आजारपणाचे कारण देत तरुणाकडून पैसे घेतले. यासाठी संशयित स्वत: ईश्वरीचा भाऊ होऊन नाशिकच्या पेठरोडवरील एका हॉटेलमध्ये आला होता. तेथे त्याने ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले होते. पोलिसांनी त्या मोबाइल क्रमांकाची माहिती घेत संशयित अर्जुन उफाडेला पकडले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT