Latest

नाशिक : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टने ठेंगोड्यात तणाव, अल्पवयीन मुलगा ताब्यात

गणेश सोनवणे

लोहोणेर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर किशोरवयीन मुलाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने ठेंगोडा गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सटाणा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बुधवारी (दि.12) रात्रीच त्या मुलाला ताब्यात घेत त्याच्या कुटुंबीयांनाही सुरक्षित स्थळी हलविले. मात्र, त्या युवकाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होऊन पंचक्रोशीतील तरुणांनी ठेंगोडामध्ये दाखल होत तीव्र संताप व्यक्त करत रात्री एक दुकान पेटवून दिल्याने तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, झाल्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.13) ठेंगोडावासीयांनी कडकडीत बंद पाळला.

ठेंगोडा येथील एका युवकाने बुधवारी रात्री देवतांबाबत आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल होऊन काही युवकांनी आक्षेप नोंदवला. या प्रकाराविषयी पोलिसपाटील कचरदास बागडे यांनी सटाणा पोलिसांना खबर दिली. पोलिसांचे पथक तत्काळ गावात दाखल झाले. दरम्यान, त्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होऊन पंचक्रोशीतील अनेक तरुण रात्री दहा ते अकरा वाजेदरम्यान गावात दाखल होत 'बजरंगबली की जय, जय श्रीराम'च्या घोषणा देत संताप व्यक्त करू लागले. संप्तत जमावाने एक दुचाकी दुरुस्तीचे दुकान पेटवून दिले. पोलिसांनी जमावाला पांगवत शांतता प्रस्थापित केली.

गुरुवारी सकाळी या घटनेचे पडसाद पुन्हा उमटले. रात्री घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ठेंगोडा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवत संबधित युवकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली. संप्तत जमाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमा झाला. यावेळी पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी जमावाला शांत करीत केलेल्या कारवाईची माहिती देत शांतता राखण्याचे आवाहन केले.

सामाजिक बहिष्काराचा इशारा

ठेंगोडा ग्रामपंचायत कार्यालयात मुस्लीम पंच कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शांतता समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. मुस्लीम पंच कमिटीने घटनेचा निषेध नोंदवत संबंधित युवकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. धार्मिक भावना भडकतील, असे कृत्य करणार्‍यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा कमिटीचे माजी अध्यक्ष कपिल शेख यांनी यावेळी दिला. माजी सरपंच मधुकर व्यवहारे, प्रदीप शेवाळे, वसंत शिंदे, शांताराम वाघ, पोलिसपाटील बागडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच भारती वाघ, उपसरपंच सुनील नारायण निकम, रवी मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सोशल मीडियावर पोस्ट टाकणारा अल्पवयीन असून, त्याचे वय 17 वर्षे 6 महिने आहे. त्याच्यावर भादंवि कलम 1860 अन्वये 253 (अ) व 295 (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येत आहे. तर त्याच्या परिवाराला सुरक्षेच्या दृष्टीने निरीक्षणाखाली ठेवले होते. दुपारी त्यांना सोडण्यात आले. गावात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलिस तैनात आहे. हवालदार पी. एन. भोईर अधिक तपास करीत आहेत.

– किरण पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT