Latest

Nanded Government Hospital : शासकीय रूग्णालयातील औषधांच्या तुटवड्यामुळे २४ बालकांना गमवावा लागला जीव?

अविनाश सुतार

नांदेड: पुढारी वृत्तसेवा: हाफकिन'ने औषधी खरेदीचा गोंधळ घातल्यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांनाही वेळेत औषधी न मिळाल्याने जीव गमवावा लागण्याची वेळ येत आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णालयात दर तासाला एक म्हणजेच २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. त्यामुळे नांदेडात एकच खळबळ उडाली आहे. (Nanded Government Hospital)

कोरोनानंतर राज्यात सत्तानाट्य घडले. या सत्तानाट्यानंतर सत्ताधाऱ्यांचा सर्वाधिक वेळ हा एकमेकांची नाराजी दूर करण्यातच जात आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेला मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. 'हाफकिन'ने औषधी खरेदी करून न दिल्याने गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठाच करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. (Nanded Government Hospital)

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच गेल्या २४ तासांत रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा समावेश आहे. परंतु, रुग्णालय प्रशासन मात्र अत्यवस्थ असलेल्या अन् शेवटच्या क्षणी रेफर रुग्णांचा मयतांमध्ये समावेश असल्याचा दावा करीत आहे. परंतु, या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

'डीपीडीसी'च्या निधीतील खरेदी तांत्रिक मान्यतेत अडकलीजिल्हा नियोजन समितीकडून रुग्णालयासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १ कोटी रुपयात यंत्रसामग्री, १ कोटीची औषधी खरेदी, १ कोटी शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन फ्लँटसाठी ठेवण्यात आले आहेत; परंतु चार कोटींच्या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळे १ कोटींची औषधी खरेदी रखडली आहे.

एक्स्पायरी डेट संपतेय, द्या पाठवून रुग्णालयात अत्यावश्यक औषधी नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात एक्स्पायरी डेट संपत असलेल्या औषधींचा साठा गरज पडल्यास मागवून घेण्यात येत आहे. नेत्यांच्या वाढदिवशी औषधी भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने खरेदी केलेल्या ४० लाखांच्या औषधांचा साठा संपत आला आहे.

मृतांमध्ये रेफर रुग्ण अधिक रुग्णालयात शेजारील चार ते पाच जिल्ह्यांतून रुग्ण येतात. अनेकजण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. पैसे संपल्यानंतर शेवटच्या क्षणी ते शासकीय रुग्णालयात येतात. आलेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही दाखल करून घेतो. त्यामुळे मृत्यूचा आकडा मोठा दिसतो. औषधांचा तुटवडा आहे. परंतु, औषधे नसल्याने रुग्णाचा जीव गेला, असे म्हणता येणार नाही. लवकरच 'डीपीडीसी'च्या निधीतून औषधे खरेदी करण्यात येणार आहेत.

– डॉ. एस. आर. वाकोडे, अधिष्ठाता

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT