Latest

प्रा. एन. डी. पाटील अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

backup backup

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर आज कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही दिवंगत प्रा.एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पोलीस दलातर्फे मानवंदना

पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वर्गीय प्रा.एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास, स्नुषा संगीता, नात रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रा.पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी खासदार, लोकप्रतिनिधी, शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनीही दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी दिवंगत प्रा.एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास पाटील यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.