पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा हंगाम सुरु झाला की, सर्वाधिक चर्चा होणार्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा समावेश होता. चेन्नई म्हटलं की महेंद्रसिंग धोनी हे समीकरण आता पक्कं झालं आहे. यंदाच्या हंगामात पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचा संघाचा दुसरा सामना लखनौविरुद्ध झाला. या सामना चेन्नईने १२ धावांनी जिंकला मात्र यानंतर धोनीने थेट कर्णधारपद सोडण्याची धमकी दिली आहे. ( MS Dhoni CSK captain ) जाणून घेवूया सामन्यात असं काय घडलं की धोनीने थेट कर्णधारपद सोडण्याची धमकी दिली.
लखनौविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं?
सोमवारी झालेल्या लखनौविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २१७ धावा केल्या. मोठी धावसंख्या उभारुनही चेन्नई संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवता आला नाही. कारण चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी भरपूर अतिरिक्त धावा दिल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी १३ वाइड आणि तीन नो बॉल फेकले. तुषार देशपांडे तिन्ही नो बॉल टाकले. या अतिरिक्त धावांमुळे धोनी प्रचंड संतापला.
लखनौविरुद्ध चेन्नईचे वेगवान गोलंदाज चांगलेच महागात पडले. दीपक चहरने चार षटकात पाच वाईड्ससह ५५ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याचवेळी तुषारने चार षटकांत चार वाइड आणि तीन नो बॉलसह ४५ धावा लुटल्या. मात्र त्याने दोन विकेट्सही घेतल्या. बेन स्टोक्सने एका षटकात १८ धावा दिल्या. तर हंगरगेकरने दोन षटकात २४ धावा दिल्या. स्पिनर्सच्या जोरावर चेन्नईने सामना जिंकला. मोईन अलीने चार षटकांत २६ धावा देत चार बळी घेतले. सँटनरने चार षटकांत २१ धावा देत एक बळी घेतला.
MS Dhoni CSK captain : धोनी कर्णधारपदावर काय म्हणाला?
सामन्या संपल्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, "वेगवान गोलंदाजीत आम्हाला थोडी सुधारणा करावी लागेल. आमच्या वेगवान गोलंदाजांना परिस्थितीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे विरोधी गोलंदाज काय करत आहेत हे पाहणे, त्यामुळे आमचे वेगवान गोलंदाज काय करू नये हे शिकू शकतात. त्यांना नो बॉल किंवा एक्स्ट्रा वाइड्स टाकू नयेत किंवा त्यांना नवीन कर्णधारासोबत खेळावे लागेल. हा माझा दुसरा इशारा आहे. यामध्ये सुधारणा न झाल्यास मी कर्णधारपद सोडेन." धोनीने कर्णधारपद सोडण्याची धमकी दिल्यामुळे चेन्नई संघासह सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :