Latest

MPL 2023 : एमसीए ब्ल्यू संघाची विजयी सलामी

Shambhuraj Pachindre

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेच्या दरम्यान महिलांच्या प्रदर्शनीय लढतीत शिवाली शिंदे हिने केलेल्या नाबाद 35 धावांच्या खेळीच्या जोरावर एमसीए ब्ल्यू संघाने एमसीए यलो संघावर डक वर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पावसामुळे दोन्ही संघांतील सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळविण्यात आला. यलो संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यलो संघाच्या चिन्मयी बोरपाळेने स्मृती मानधनाला झेलबाद करून ब्ल्यू संघाला पहिला धक्का दिला. पूनम खेमनारने स्मृतीचा झेल टिपला. ब्ल्यू संघ 7.3 षटकांत 1 बाद 57 धावांवर असताना पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे सामना थांबविण्यात आला.

पुन्हा पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांतील सामना प्रत्येकी 9 षटकांचा करण्यात आला. याआधी शिवाली शिंदेने 28 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 35 धावा, तर ऋतुजा देशमुखने 21 चेंडूंत 2 चौंकारांसह 23 धावा केल्या. पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यावर ऋतुजा देशमुखला धावचीत केले. ब्ल्यू संघाने 9 षटकांत 3 बाद 66 धावा केल्या; परंतु डक वर्थ लुईस नियमानुसार यलो संघाला विजयासाठी 9 षटकांत 77 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.

77 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या एमसीए यलो संघाला 9 षटकांत 4 बाद 54 धावाच करता आल्या. यात कर्णधार तेजल हसबनीस 10 धावांवर खेळत असताना ब्ल्यू संघाच्या प्रियांका गारखेडेने त्रिफळा बाद केले व यलो संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मुक्ता मगरे (16 धावा), इशा घुले (19 धावा) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. ब्ल्यू संघाकडून प्रियांका गारखेडे (1-7), माया सोनावणे (1-8), श्वेता सावंत (1-10) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 22 धावांनी विजय मिळवला.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT