Latest

MPL 2023 : कोल्हापूर टस्कर्स संघाचा दुसरा विजय

Shambhuraj Pachindre

पुणे; पुढारी वृत्तसेवा : श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी केदार जाधव (85 धावा) व अंकित बावणे (63 धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने सोलापूर रॉयल्स संघाचा 26 धावांनी पराभव करत दुसर्‍या विजयाची नोंद केली. या विजयामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाने 3 सामन्यांत 2 विजयांसह तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. केदार जाधव सामनावीर ठरला. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केदार जाधवने लक्षवेधी कामगिरी करत 52 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारांसह 85 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला मागील सामन्यात शतकी खेळी करून संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अंकित बावणेने 47 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी करून साथ दिली. सलामीच्या जोडीने 97 चेंडूत 154 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. (MPL 2023)

सोलापूर रॉयल्सचा फिरकीपटू सुनील यादवने 16 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अंकित बावणेला झेल बाद केले व ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यापाठोपाठ पुढच्याच षटकात सत्यजीत बच्चावने तिसर्‍या चेंडूवर केदारला झेल बाद करून तंबूत परत पाठवले. कोल्हापूर संघ 16.3 षटकात 2 बाद 156 धावा असा सुस्थितीत होता. उर्वरित षटकात सोलापूर रॉयल्स संघाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले. सोलापूरच्या प्रथमेश गावडे (2-54), सत्यजीत बच्चाव (1-32), प्रणव सिंग (1-35), सुनील यादव (1-36) यांनी सुरेख गोलंदाजी करत कोल्हापूर संघाला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले. कोल्हापूरचे मधल्या फळीतील फलंदाज साहिल औताडे (21 धावा), नौशाद शेख (7 धावा), तरणजीत सिंह ढिलोन (1 धाव), हे झटपट बाद झाल्यामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाचा डाव निर्धारित षटकात 5 बाद 186 धावांवर गडगडला.

याच्या उत्तरात सोलापूर रॉयल्स संघाला 20 षटकात 8 बाद 160 धावा करता आल्या. सलामीचा फलंदाज प्रवीण दिशेट्टीने 45 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांसह 53 धावांची संयमी खेळी केली. कोल्हापूरच्या मनोज यादव (3-26), अक्षय दरेकर (1-31), आत्मन पोरे (2-22), निहाल तुसामद (1-29) यांच्या अचूक मार्‍यापुढे सोलापूर संघाचे फलंदाज कालांतराने एकापाठोपाठ एक बाद होत गेले व त्यामुळे आव्हान अधिकच कठीण झाले. कोल्हापूर संघाने 26 धावांनी विजय मिळवला.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT