Latest

MPL 2023 : छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा शेवट गोड

Shambhuraj Pachindre

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नवव्या दिवशी ट्रंकवाला (नाबाद 67 धावा) व ओम भोसले (नाबाद 34 धावा) यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्ज संघाने सोलापूर रॉयल्स संघावर 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेचा शेवट विजयाने गोड केला. या स्पर्धेतील छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा हा पहिलाच विजय ठरला. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पॉवर प्लेमध्ये संभाजी किंग्जच्या आनंद ठेंगे, रामेश्वर दौड, राजवर्धन हंगर्गेकर या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. पॉवर प्ले संपेपर्यंत सोलापूर संघाने आपले तीनही फलदांज अवघ्या 15 धावांत गमावले. कर्णधार विशांत मोरेने 15 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 21 धावांची खेळी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला ऋषभ राठोडने चौफेर व संयमी फटकेबाजी करत 44 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 55 धावा काढून साथ दिली. अथर्व काळेने 26 चेंडूंत 2 चौकारांसह 23 धावांची खेळी केली. मेहूल पटेलने 11 चेंडूंत नाबाद 21 धावा केल्या. सोलापूर रॉयल्स संघाने निर्धारित षटकांत 6 बाद 140 धावा केल्या. (MPL 2023 )

140 धावांचे आव्हान छत्रपती संभाजी किंग्ज संघाने 18.5 षटकांत 3 बाद 141 धावा काढून पूर्ण केले. संभाजी किंग्ज संघाच्या मूर्तझा ट्रंकवालाने 53 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मूर्तझाला ओम भोसलेने 25 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह नाबाद 34 धावा काढून साथ दिली. या जोडीने 50 चेंडूंत 79 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी मूर्तझा ट्रंकवाला ठरला.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT