पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजस्थानच्या काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास 25 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. कोकणात 29 सप्टेंबरपर्यंत तुरळक भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांतही विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह काही भागांत मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
संबंधित बातम्या :
राजस्थानच्या पश्चिम भागापासून 25 सप्टेंबरपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. एरवी 17 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास करीत असतो. यंदा मात्र सुमारे एक आठवडा उशिरा मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, पाच दिवस कोरडे हवामान, अँटी चक्रीय स्थिती, अशी स्थिती तयार झाल्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. दरम्यान, कोकणात असलेल्या द्रोणीय स्थितीमुळे या भागात पाऊस वाढणार आहे. गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली; तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.
सोमवारी राजस्थानच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी परतला आहे. दरम्यान, दक्षिण छत्तीसगड व लगतच्या भागावर चक्रीय स्थिती असून, द्रोणीय स्थिती दक्षिण छत्तीसगड ते दक्षिण कोकणपर्यंत आहे. विदर्भात 27 सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा