Latest

Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी! मान्सून १५ दिवस आधीच घेणार निरोप, हवामान विभागाचा अंदाज

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून (Monsoon Update) यंदा लवकरच माघारी परतणार आहे. मान्सून सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे पंधरा दिवस अगोदरच म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या टप्प्यात दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सून माघारी परतण्याची सामान्य तारीख १७ सप्टेंबर आहे. पण, मान्सूनच्या वास्तविक माघारीचा प्रवास सामान्यत: एकतर आधी किंवा नंतर हवामान प्रणालीच्या गतिमान स्वरूपामुळे होतो.

"१ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या आठवड्यात वायव्य भारतातील काही भागांतून मान्सून माघारी फिरण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे," असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी जाहीर केलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात म्हटले आहे.

संपूर्ण देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा नऊ टक्के जास्त पडला आहे. पण उत्तर प्रदेश, बिहार आणि मणिपूर सारख्या राज्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या सुमारे ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा प्रत्येकी ४४ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यानंतर बिहारमध्ये हे प्रमाण ४१ टक्के, दिल्ली २८ टक्के, त्रिपुरा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी २६ टक्के आहे.

देशात १८ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ३४३.७ लाख हेक्‍टरवर भात पीक पेरणी केली होती. यंदा भात पेरणीचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत ३०.९२ लाख हेक्‍टरने कमी झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये भात पीक पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे. (Monsoon Update)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT