पुणे : एकही जिल्हा ‘रेडझोन’मध्ये नाही; राज्यात प्रथमच जून ते ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस | पुढारी

पुणे : एकही जिल्हा ‘रेडझोन’मध्ये नाही; राज्यात प्रथमच जून ते ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस

आशिष देशमुख / शिवाजी शिंदे

पुणे :  गेल्या तीन वर्षांत या वर्षी प्रथमच राज्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत पावसाने समाधानकारक प्रगती केली असून, यंदा एकही जिल्हा ऑगस्टअखेर ‘रेड झोन’मध्ये (अवर्षणग्रस्त) नाही. राज्यात नाशिक, नांदेड आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत पाऊस सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक झाला, तर 16 जिल्ह्यांत मुसळधार व उर्वरित 17 जिल्ह्यांत सर्वसाधारण पाऊस पडला आहे. जूनमध्ये राज्यात खूप कमी पाऊस पडल्याने तो सरासरी उणे 68 टक्के इतका होता. मात्र, जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत पावसाने जूनमधील तूट केवळ भरून काढली नाही, तर सरासरी गाठत सर्वच जिल्ह्यांना त्याच्या पलीकडे नेले. गेल्या तीन वर्षांत असे चित्र प्रथमच दिसून आले.

2019 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीत विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अकोला, तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, तर मध्य महाराष्ट्रात नगर, सोलापूर, मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, बीड या भागांत ऑगस्टअखेर अत्यल्प पाऊस नोंदविला गेला होता. पुढे परतीच्या पावसाने हे चित्र बदलले. मात्र, यंदा परतीच्या पावसाच्या आधीच राज्यात एकही जिल्हा अवर्षणग्रस्त (उणे 20 ते उणे 59 टक्के ) व अतिअवर्षणग्रस्त (उणे 60 ते उणे 99 टक्के) असा नाही.

राज्यात कमी दाबाच्या पट्ट्याचा सकारात्मक परिणाम जूनमध्ये कमी दिसला. त्यामुळे या महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली. मात्र, जुलैचा दुसर्‍या आठवड्यापासून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. 20 जुलैपर्यंत जूनची तूट पावसाने भरून काढली. त्यापुढे मात्र अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. नद्या व धरणे दुथडी भरून वाहू लागली. ऑगस्टअखेर सर्वच धरणे 90 टक्क्यांहून अधिक भरली. जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले. त्याचा सकारात्मक परिणाम पाऊस पडण्यावर झाला.

अतिमुसळधार पावसाचे जिल्हे (60 टक्क्यांहून अधिक)
नाशिक- 63 टक्के, नांदेड-63 टक्के
वर्धा-61 टक्के

मुसळधार पावसाचे जिल्हे (20 ते 59 टक्के)
नंदुरबार -23 , धुळे-39, पालघर -37, पुणे-37, सातारा- 28, औरंगाबाद- 27, बीड-23, उस्मानाबाद-40, लातूर-37, परभणी-22, यवतमाळ-32,नागपूर-58. चंद्रपूर-35, भंडारा-37, गोंदिया-37
गडचिरोली-43

साधारण पाऊस (19 टक्क्यांपर्यंत – सरासरीपेक्षा जास्त)
ठाणे 14, मुंबई उपनगर14, मुंबई- उणे 10, रायगड4, रत्नागिरी9, सिंधुदुर्ग-8, कोल्हापूर-14, सांगली-उणे 16, सोलापूर-17, नगर-17, जालना-4, जळगाव-7, बुलढाणा-उणे 2, अकोला- उणे 7, अमरावती-11, वाशिम -11, हिंगोली- उणे 4.

Back to top button