Latest

Navneet Rana: ‘शेर तो शेर ही होता है’, मोदी २०२४ मध्ये पुन्हा येतील : नवनीत राणा

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यात मोठे यश प्राप्त केले आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे भाजपला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमत मिळाले आहे. एक्झिट पोल देखील या निकालात अनेक ठिकाणी फोल ठरल्याचे दिसून आले आहे. या निवडणूक निकालावरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'शेर तो शेर ही होता है, फिर चाहे कोई कितना भी झुंड बना के निकले', अशी प्रतिक्रिया देत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांवर निशाणा साधला. Navneet Rana

मागील काही काळापासून देशभर पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचे काम विरोधक करत होते. पाच राज्यात झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष एकत्र आल्यामुळे वेगळा काहीतरी निकाल पाहायला मिळेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील निकाल पाहता 'शेर तो शेर ही होत आहे' हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीचे नाव न घेता त्यांनी कितीही पक्ष एकत्रित आले आणि लोकांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात कितीही अपप्रचार केला. तरी लोकांच्या मनात मोदी आहेत. ज्या राज्यात मतदान झाले तेथील निकालावरून ते स्पष्ट दिसते आहे, असे खासदार राणा म्हणाल्या. दरम्यान, त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचे देखील विशेष कौतुक केले. Navneet Rana

खासदार राणा यांनी विरोधकांवर देखील टीका केली. काही लोक सकाळी उठल्यापासून भाजप व मोदी यांच्या संदर्भात बोलत होते. अनेक मंचावरून बोलणाऱ्या पोपटांची बोलती देखील या निकालावरून बंद झाली आहे, असे त्या म्हणाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील मोदी पुन्हा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT