Latest

मोदी सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल : शरद पवार

करण शिंदे

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचा गैरवापर करत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री मोदींच्या धोरणांशी विसंगत होते. त्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. देशाची राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रचंड काम केले. मात्र, काम करणारे आणि स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती मोदींना पटत नाहीत. त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांना जेलमध्ये टाकले जाते, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. मोदी हळूहळू हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हुकूमशाही येवू द्यायची नाही, असे आवाहनही जनतेला त्यांनी केले. इचलकरंजी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

पुढे पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरा करीत आहेत, सभा करीत आहेत. त्यांच्या सभेमध्ये शरद पवार आणि उध्दव ठाकरे या दोघांवर टीका केली जात आहे. मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी काय करणार यावर ते भाष्य करीत नाहीत. शेतकरी अडचणीत आहे, शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र त्याकडे मोदींचे दुर्लक्ष आहे.

मोदी सरकार हे 'गजनी' सरकार : उध्दव ठाकरे

मोदी सरकारमधील नेत्यांना आधीच्या निवडणूकीत काय बोलले ते लक्षात राहत नाही. त्यामुळे मोदी सरकार हे 'गजनी' सरकार असल्याची घणाघाती टीका उध्दव ठाकरे यांनी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संघर्षाने मुंबई महाराष्ट्रात सामावून घेतली. मात्र, दिल्लीतले दोन घोडेबाज महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेत आहेत. सध्याचे दळभद्री सरकार राज्यात नव्हे तर देशात येणार नाही, हे आता जगभर झाले आहे.

मोदी यांच्या फालतू गप्पा झाल्या असतील, तर चाय पे चर्चा न करता मुद्यांवर चर्चा करा. जर लोकांनी त्यांना स्वीकारले तर आम्ही घरी बसू. मात्र महाराष्ट्राचे लुटले जाणारे वैभव थांबवूच पण जे वैभव लुटले तेही परत आणू असेही ठाकरे म्हणाले. मोदी शेतकर्‍यांच्या बाजूचे असल्याचा आव आणतात. मग काळे कायदे का आणले, शेतकरी आंदोलन का चिरडले, असा सवाल उपस्थित करीत 700 शेतकऱ्यांना आंदोलनात आपला जीव का गमवावा लागला याचे स्पष्टीकरण द्यावे. त्यामुळे महाराष्ट्रात येवून भटकती आत्मा शोधण्यापेक्षा त्या शेतकर्‍यांचा आत्मा काय म्हणत असेल, असा सवालही त्यांनी केला.

आ.जयंत पाटील म्हणाले, इचलकरंजी मतदारसंघाला दोन खासदारांचा अनुभव आहे. एक खासदार निवडणुका जवळ आल्या की आंदोलन करतो तर दुसर्‍या खासदाराचा अनुभव तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे सत्यजीत पाटील यांच्यासारखा नवीन चेहरा निवडून द्या. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर इचलकरंजीचा पाणी प्रश्न ते सहा महिन्यात सोडवतील. महाराष्ट्रात शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची लाट आहे. त्यांना महाराष्ट्रातून वाढता पाठींबा पाहता परिवर्तनाची नांदी दिसत असून जनता भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे 32 ते 35 खासदार निवडून येतील. भाजपच्या सत्तेचा वारु महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार रोखत आहेत. त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्रात सभा घेवून पवारांना लक्ष्य करीत आहेत. मात्र 4 जूनला मतमोजणीवेळी महाराष्ट्राचा शरद पवार हाच आत्मा आहे हे सिध्द होईल. असा दावा आणि त्यांनी केला.

सत्यजित पाटील-सरुडकर म्हणाले, भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षांत वस्त्रोद्योग, कामगार, महिला, शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्वच घटकांना फसवले आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. इचलकरंजीचा पाणी प्रश्न, वस्त्रोद्योगाचा प्रश्न आजी-माजी खासदारांनी सोडवला नाही. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेवून व कोणावरही अन्याय न करता पाण्याचा प्रश्न सोडवू. सरकारने टफ योजना बंद केली. फसवी वीज सवलतीची घोषणा केली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सरकार जुमलेबाजी करुन फसवे उद्योग करते. शेतकर्‍यांचा खरा शत्रू सध्याचे भाजपाचे सरकार असून शेतकर्‍यांचा चांगले दिवस पाहिजे असतील तर हे सरकार पाडा, असे आवाहन केले.

या सभेवेळी आ.मानसिंग नाईक, माजी आ.अशोकराव जांभळे, माजी आ.राजीव आवळे, उल्हास पाटील, शशांक बावचकर, विनय महाजन, प्रताप होगाडे, सदा मलाबादे, सुकुमार कांबळे, सयाजी चव्हाण यांचीही भाषणे झाली. या सभेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT