Latest

मध्‍य प्रदेशमध्‍ये जमावाचा पोलिस स्‍टेशनवर हल्‍ला, तीन आरोपींचे पोलीस कोठडीतून पलायन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Madhya pradesh news मध्‍य प्रदेशमधील बुरहानपूर जिल्‍ह्यातील नेपानगर पोलीस स्‍टेशनवर जमावाने हल्‍ला केला. यानंतर जमावाने पोलीस कोठडीतील तीन आरोपींसह पलायन केले.  या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

नेपानगर पोलीस स्‍टेशनमध्‍ये शुक्रवारी रात्री चार पोलिस कर्मचारी होते. जमावाने अचानक पोलिस स्‍टेशनवर हल्‍ला केला. पोलीस कर्मचार्‍यांना काठीने मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. यामध्‍ये हल्‍लेखोर पोलीस स्‍टेशनची तोडफोड करताना आणि पोलिसांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. जमावाने पोलिस ठाण्‍याच्‍या मुख्‍य गेटच्‍या काचा फोडल्‍या. या हल्‍ल्‍यात पोलीस उपनिरीक्षक गुलाब सिंह यांच्‍यासह अजय मालवीय हे जखमी झाले.

या घटनेबाबत बुरहानपूरचे पोलीस अधीक्षक राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, पोलिसांनी मेघवाल या संशयित आरोपीला लूटमारप्रकरणी अटक केली होती. त्‍याला नेपानगर पोलिस स्‍टेशनच्‍या कोठडीत ठेवण्‍यात आले होते. सायंकाळी अचानक मेघवाल याचा साथीदार सुदियासह ५० हून अधिक जणांनी पोलिस स्‍टेशनवर हल्‍ला केला. यानंतर मेघवालासह पोलिस कोठडीत असणार्‍या दोघांनी पलायन केले. या हल्‍ल्‍यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

बुर्‍हाणपूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर यापूर्वीही जमावाने हल्ला केला होता. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील घाघराळा जंगलातून काढण्यासाठी गेलेल्या पथकावर वन अतिक्रमणकर्त्यांनी हल्ला केल्याने एका वन कर्मचाऱ्यांसह सहा जण जखमी झाले होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT