

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण केले. मुर्मू यांच्या आधी २००९ मध्ये देशाच्या १२ व्या राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील यांनी सुखोईमधून उड्डाण केले होते. त्यामुळे प्रतिभा पाटील यांच्यानंतर अशी कामगिरी करणाऱ्या जगातील त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
भारतीय वायुदलाचे सुखोई हे एक महत्वाचे विमान मानले जाते. या विमानातून राष्ट्रपती मूर्मू यांनी आज उड्डाण केले. यावेळी त्या वायुदल पायलटच्या गणवेशात दिसून आल्या. याआधी प्रतिभा पाटील यांनी सुखोई विमानातून उड्डाण करून दोन विश्वविक्रम केले. पहिले सुखोई उडवणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. तर दुसरा असा विक्रम करणाऱ्या देशातील सर्वात वृद्ध महिला राष्ट्रपती होत्या. तेव्हा प्रतिभा पाटील ७४ वर्षांच्या होत्या. त्यांचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेले आहे. त्यांच्या आधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती असताना ८ जून २००६ रोजी सुखोई उडवले होते. असे करणारे ते देशाचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांच्या पाठोपाठ प्रतिभाताई पाटील यांनी सुखोईतून उड्डाण भरले होते. आता मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
२५ नोव्हेंबर २००९ रोजी पुण्यातील वायुसेनेच्या लोहेगाव तळावरून प्रतिभा पाटील यांनी विंग कमांडर ए साजन यांच्यासोबत १० हजार फूट उंचीवर, सुमारे ८०० किलोमीटर प्रति तास वेगाने, अर्धा तास उड्डाण केले. सुखोई ३० एमकेआय उड्डाण केल्यानंतर, लष्कराच्या गणवेशात राष्ट्रपती पाटील यांनी टी-९० लढाऊ रणगाड्यातून राई़ड केली होती.
निर्मला सीतारामन यांनी संरक्षण मंत्री असताना १७ जानेवारी २०१८ रोजी सुखोई ३० एमकेआय मधून उड्डाण केले होते. देशातील सर्वात प्रगत लढावू जेट सुखोई उडवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी सुखोई ३० एमकेआय मध्ये २१०० किमी प्रतितास वेगाने जोधपूर एअरबेसवरून ८ हजार मीटरपेक्षा जास्त अंतर उड्डाण केले.