Latest

नागपूर : मनसेची ॲमेझॉन कार्यालयात तोडफोड, पाकिस्तानी झेंडे विक्रीचा आरोप

Shambhuraj Pachindre

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ॲमेझॉनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या झेंड्याची ऑनलाईन विक्री केली जात असल्याच्या विरोधात आज (दि.२२) दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या गणेशपेठ येथील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. भेटण्याची वेळ मागणारे पत्र दिल्यानंतर ती न देता दार लावून घेण्यात आल्याचा संताप व्यक्त करीत थेट कार्यकर्ते दार तोडून आत घुसले.

या आंदोलनात हाती मिळेल, त्या वस्तूची फेकाफेक, खुर्च्या, फर्निचरची तोडफोड करण्यात आल्याने वातावरण तापले होते. शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ॲमेझॉन कंपनी पाकिस्तानी झेंडे ऑनलाईन विकत असल्याच्या विरोधात तसेच हिंदू धर्माविरोधी पुस्तक विकण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

स्वतः ऑर्डर करून याविषयीची खात्री करण्यात आली. असे यावेळी माध्यमांशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. देशातील वातावरण बिघडवणाऱ्या प्रवृत्तींना मदत करण्याचा हा प्रयत्न आहे. तरी तातडीने कंपनीने ही विक्री थांबवावी, असे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावे देण्यात आले.

यासह देशवासीयांची माफी मागावी, अशा मागण्या करण्यात आल्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला. दुर्गेश साकुलकर यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते हजर होते. आंदोलनाची कुणकुण लागल्याने घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसेचे हाती फलक घेत, घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन सुरू होते.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT