पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएलने ७१ वी मिस युनिव्हर्स स्पर्धेचा किताब पटकावला. व्हेनेझुएलाची फर्स्ट रनर अप डायना सिल्वा आणि दुसरी रनर अप डॉमिनिकन रिपब्लिकची एमी पेना होती. ही स्पर्धा न्यू ऑरलियन्स (अमेरिका) मध्ये झाली. यामध्ये 25 वर्षीय दिविता रायने भारताचे प्रतिनिधीत्व केले. दिविता टॉप 5 मध्ये पोहोचू शकली नाही. या स्पर्धेत जगभरातील 86 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेली दिविता टॉप 16 मध्ये पोहोचली होती. राष्ट्रीय वेशभूषा फेरीत दिविताने 'सोने की चिडिया' बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारताला एके काळी 'सोने की चिडिया' म्हटले जायचे. दिविताच्या या गोल्डन कलरच्या ड्रेसने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची तीच प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला. दिविताला मागील वर्षी २८ ऑगस्टला मिस दिवा ऑर्गनायजेशनच्या १० व्या वार्षिक समारंभात हरनाज संधूने मिस दिवा युनिव्हर्स २०२२ चा मुकूट परिधान केला होता. (Miss Universe 2023)
नॅशनल कॉस्च्यूम राऊंडसाठी दिविताने 'सोने की चिडिया' (सोन्यासारखे दिसणारे पंख) ही थीम डोळ्यांसमोर ठेवून त्यासारखे कपडे घालून स्वत:ला सादर केले. गोल्डन आऊटफिटसोबत गोल्डन पंख लावून दिविता मिस युनिव्हर्स स्टेजवर पोहोचली होती. डिझायनर अभिषेक शर्मानुसार, "हा राष्ट्रीय पोशाष भारताच्या सोन्याच्या चिमणीच्या रूपात एक अलौकिक, विविधतेसोबत सद्भावना, आध्यात्मिक आणि सोबतच आमच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक सादर करतो."
स्टेजवर दिविता भारताची अर्थव्यवस्था, विविधता आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना खूप सुंदर दिसत होती. २५ वर्षांच्या दिविता रायने ऑगस्टमध्ये लिवा मिस दिवा युनिव्हर्स २०२२ जिंकले होते.
दिविताचा जन्म १० जानेवारी, १९९८ रोजी मंगलोरमध्ये झाला. आता ती मुंबईत राहते. तिने कर्नाटकातील राजाजीनगरमधील नॅशनल पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती मुंबईला आली. तिने मुंबईतील सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून बॅचलर डिग्री घेतली. दिविता पेशाने एक मॉडेल आहे. त्याचसोबत ती एक आर्किटेक्टदेखील आहे. दिविताला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळणं खूप आवडते. तिला पेटिंग आणि संगीतदेखील आवडते. दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात.
दिविता, सुष्मिता सेनला आपले आदर्श आणि प्रेरणा मानते. दिविता मानते की, सुश्मिताने भारतामध्ये अनेक मुलींना मिस युनिव्हर्सच्य़ा मंचापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा दिली आहे. दिविता आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेते. ती म्हणते-'माझ्या वडिलांनी आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी शिक्षणाच्या शक्तीचा वापर केला. त्यांनी पैसे कमावण्यासाठी स्वत:ला सशक्त बनवलं आणि आमच्या परिवाराला मदत केली.'