मुंबई ; पुढारी ऑनलाईन : फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. यावरून भाजप विरुद्ध राज्य सरकार असा नवा सामना उभा राहण्याची चिन्हे आहेत. आधी फडणवीस यांना बीकेसीतील सायबर विभागाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. नंतर पोलिसांनीच माघार घेतली आणि फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी प्रतिक्रीया दिली.
यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की,"फडणवीसांची चौकशी राजकीय सुडबुद्धीने करण्यात आली नाही. भाजपला आरोप करण्याची सवय आहे. आम्ही केंद्रिय तपास यंत्रणांप्रमाणे काम करत नाही. जी काही न्यायप्रक्रिया असते त्याप्रमाणे काम चालू आहे"
फडणवीस यांनी आपण रविवारी सकाळी 11 वाजता सायबर सेलच्या कार्यालयात हजर होणार असल्याचे जाहीर केले होते. तसे झाले असते, तर या कार्यालयाच्या बाहेर शक्तिप्रदर्शन करण्याची पूर्ण तयारी भाजपने केली होती. तो धोका लक्षात घेऊन गुन्हे विभागाचे सहपोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी स्वत: फडणवीस यांना फोन केला आणि तुम्ही सायबर सेलमध्ये येण्याची गरज नाही. आम्हीच आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी येत असल्याचे कळवले. फडणवीस यांनीही पोलिस ठाण्याला जाण्याचा निर्णय रद्द केला.
आपण विरोधी पक्षनेते आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकरणाची माहिती घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. हा माझा विशेषाधिकार आहे. माझ्या माहितीचा स्रोत मला विचारला जाऊ शकत नाही. तरीदेखील आपण चौकशीला सामोरे जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी सर्व कार्यक्रम रद्द करून घरीच थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचलं का?