Latest

Marathwada Rain : मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा: अतिवृष्टीने पिके जमीनदोस्त, नदीनाल्यांना पूर

अविनाश सुतार

परभणी, नांदेड: मराठवाड्यातील अनेक भागात रविवारी (दि.२७) रात्री विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सुद्धा सकाळपासून वातावरण ढगाळ असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्याचे वृत्त आहे. Marathwada Rain

परभणी जिल्ह्याला सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने झोडपून काढले. तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी 65 मि.मी. म्हणजेच अतिवृष्टी इतका पाऊस झाला आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या पावसाळ्यातही केवळ 4 तासांत अतिवृष्टी इतका पाऊस झाला नव्हता. तो या अवकाळीने नोंदविला गेला आहे. जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक 93.4 मिमी.पाऊस झाला. Marathwada Rain

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच वर्तविलेल्या अंदाज्यानुसार येत्या तीन दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे म्हटले होते. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचा कोणताही मागमुस नव्हता. मध्यरात्री व सोमवारी पहाटे शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वार्‍यासह झालेल्या या पावसाने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सोमवारी दुपारपर्यंत खंडित झाला होता. विद्युत तारा व खांब कोलमडले गेले.

ओढे व नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यंदाच्या हंगामानंतर झालेला हा अवकाळी पाऊस विक्रमी ठरला. जिंतूर पाठोपाठ पूर्णा तालुक्यात 81.2 तर परभणीत 68.4 मि.मी. पाऊस झाल्याने या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ज्वारी, हरभरा व तुरीला मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत पाथरीत 60.9, गंगाखेडमध्ये 41.1, पालमध्ये 52, सेलूत 61.9, सोनपेठमध्ये 38.7 तर मानवतमध्ये 59.2 मि.मी. असा सरासरी 65 मि.मी. पाऊस केवळ चार तासांतच झाला आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली आहे. जून ते डिसेंबरपर्यंत 865 मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. तो आतापर्यंत 68 टक्के झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वरूणराजाने हजेरी लावली. वसमत तालुक्यातील आडगाव येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मध्यरात्री दोन वाजेपासून सुरू झालेल्या मेघगर्जनीसह पाऊस व सोबतच विजांच्या कडकडाटाला ही सुरुवात झाली.

दरम्यान, या पावसामुळे हरभरा पिकांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे हरभरा पिकाला मर लागण्याची शक्यता आहे. तसेच वेचणीस आलेल्या कापसालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कापसाचे झाडे पूर्णतः झोपली आहेत. याचबरोबर फुलांच्या अवस्थेत असलेल्या तुरीचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा खरीप हंगामात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन सुद्धा झाले नाहीत. पीक विमा आणि सरकारचे अनुदानही अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. कर्ज काढून कशी बशी शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली होती. आणि त्यातच अवकाळी पावसामुळे त्याचे हे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. ताबडतोब झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Marathwada Rain नांदेड जिल्ह्यात पाच तालुक्यांमधील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी –

1. नांदेड – १. नांदेड शहर – ६८.००मिमी,२. लिंबगाव – ९९.०० मिमी,३. तरोडा – ८२.३० मिमी, ४. नाळेश्वर – ७०.८० मिमि

2. अर्धापूर -अर्धापूर – ७७.५० मिमी, दाभड – ६९.०० मिमी

3. कंधार -उस्माननगर ७६.३० मिमी,

4. लोहा – १. सोनखेड – ७६.३० मिमी, २. कलंबर – ७६.३० मिमी, ३. शेवडी – ७४.०० मिमि

5. हदगाव -१. तामसा – ६५.३० मिमी, २. पिंपरखेड – ६५.३० मिमी

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT