हदगाव; पुढारी वृत्तसेवा: पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हदगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील विद्यार्थिंनींना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या धान्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना दि. ९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी मुख्याधपिका अलका अरविंद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादि वरून हदगाव पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त सुट्टी असल्यामुळे शिक्षक सुट्टीवर होते. याचा फायदा चोरट्यांनी घेत १७ क्विंटल तांदूळ (अंदाजे किंमत ३६ हजार), १ क्विंटल ५० किलो चना (अंदाजे किंमत ६ हजार), १ क्विंटल ५० किलो वटाणा (६ हजार), १ क्विंटल ५० किलो मूगडाळ (अंदाजे किंमत ९ हजार), ७४ किलो खाद्यतेल (अंदाजे किंमत ३ हजार ७००), १५० जेवणाच्या प्लेट (अंदाजे किंमत ६ हजार), दह खुर्च्या, एक गॅस सिलिंडर टाकी असे धान्य आणि साहित्य मिळून ६९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पसार केला. नांदेड पोलिसांनी श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. परंतु कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम करीत आहेत.
हदगाव शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहेत. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे शहरात चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा