Latest

माढयाचा तिढा नागपुरात; फडणवीस यांच्याकडे मॅरेथॉन बैठक

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: माढ्यामध्ये एक न्याय तर बारामतीत दुसरा न्याय चालणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याने या संदर्भातील तिढा सोडविण्यासाठी आज (दि. १२) दुपारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी एक मॅरेथॉन बैठक पार पडली.

विशेष म्हणजे या बैठकीसाठी रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल स्वतः खासगी विमानाने नागपुरात दाखल झाले होते. धैर्यशील पाटील यांच्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील देखील भाजपचा राजीनामा देण्याची शक्यता लक्षात घेता नागपुरातील या बैठकीला महत्व आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील जाहीर सभांच्या निमित्ताने दौऱ्यावर असल्याने ही बैठक तातडीने पार पडली.

यापूर्वी अमरावती, यवतमाळ, नाशिक अशा अनेक मतदार संघातील बैठका नागपुरात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावर झालेल्या आहेत हे विशेष. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा येथून सतत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधात लढत आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ही भावना असणे स्वाभाविक आहे. मात्र, शेवटी माढा येथील उमेदवार की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाचे आहे, देशाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे की नरेंद्र मोदी यांनी करावे, देशाचे धोरण, एकंदरीत राजकारण आणि देशाच्या प्रगतीचा वेग ठरविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे.

रामराजे निंबाळकर यांच्या नाराजी वरून भाजपात सुरू असलेला मतप्रवाह यावेळी फडणवीस यांच्या कानी घालण्यात आला. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीतून निश्चित मार्ग काढतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. युती धर्म सर्वांनीच पाळावा, अशी भावना आमदार राहुल कुल यांनी यावेळी बोलून दाखवली. माढामध्ये राष्ट्रवादीने मदत करावी, बारामतीत देखील मदत करावी चर्चेतून नक्कीच नाराजी दूर होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT