Latest

कोल्हापूर : सैनिक टाकळी गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी! मराठा आरक्षणाचा लढा तीव्र

Shambhuraj Pachindre

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. राजकीय नेत्यांबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाची पहिली ठिणगी शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावात पडली असून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसा फलक बस-स्थानक चौकात लावण्यात आला आहे.

दरम्यान शनिवारी ( दि.२८) संध्याकाळी समस्त सैनिक टाकळीकरांच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. कॅन्डल मार्चची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सात वाजता होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला दिलेली मुदत संपत आली आहे. राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आंतरवाली सराटी येथे महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू होते. यावेळी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सैनिक टाकळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या आशयाचा फलक मुख्य चौकात लावला आहे.

सदर फलकावर 'चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष्य', मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही, आपली मान व मर्यादा राखून गावात प्रवेश करावा, सर्वपक्षीय, राजकीय आमदार, खासदार व मंत्र्यांना सैनिकी परंपरा असलेल्या. सैनिक टाकळी गावात प्रवेश बंदी. असा मजकूर असलेला भला-मोठा फलक मुख्य चौकात लावला आहे. तो सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

SCROLL FOR NEXT