जमिनीच्या भरपाईसाठी उपोषणास्त्र ; न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय | पुढारी

जमिनीच्या भरपाईसाठी उपोषणास्त्र ; न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  रुईगव्हाण व भोसा येथील कुकडी डावा कालवा व भोसा खिंड प्रकल्पातील संपादित जमिनीतील शेतकर्‍यांचे पैसे मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेतर्फे उपोषण सुरू करण्यात आले. या प्रश्नावर निर्णय झाल्याशिवाय माघार न घेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. कर्जत तालुक्यातील कुकडी डावा कालवा व भोसाखिंड या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचे पैसे शेतकर्‍यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून आंदोलन सुरू करण्यात आले.

या आंदोलनात लालासाहेब सुद्रिक, राजेंद्र जामदार, अमोल जामदार, भगवान जामदार, शरद जामदार, प्रकाश जामदार, कार्तिक जामदार, भास्कर पवार, भाऊसाहेब महाडिक, नामदेव गुंड, नवनाथ मेरगळ, अरुण खुरंगे, इस्माईल शेख, आदम शेख, श्याम चव्हाण, मधुकर खराडे, कपूर शेख, हनुमंत गुंड, अमोल निंबाळकर, रामेश्वर निंबाळकर, सुभाष खराडे, पंडित चव्हाण सहभागी झाले आहेत.
यावेळी लालासाहेब सुद्रिक व राजेंद्र जामदार म्हणाले, कुकडी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील रुई गव्हाण व भोसा खिंड प्रकल्पात शेतकर्‍यांच्या जमिनी जलसंपदा विभागाने घेतल्या आहेत. या जमिनीची भरपाई मिळावी, यासाठी सातत्याने शेतकरी पाठपुरावा करीत होते. मात्र, जलसंपदा विभाग दखल घेत नसल्यामुळे न्यायालयामध्ये या संदर्भात खटला दाखल केला. न्यायालयाने शेतकर्‍यांना शेत जमिनीचे वाढीव रक्कम देण्याबाबत आदेश देऊनही त्याची या निकालाप्रमाणे भूसंपादन अधिकारी व कुकडीचा कोळवडे विभागाकडून वाढीव नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली नाही.

Back to top button