Latest

नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका

निलेश पोतदार

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा भर उन्हाळ्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारे, पाऊस, गारपिटीने विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावल्याने तापमान कमालीचे कमी झाले आहे. नागपुरातील विविध भागात (शनिवार) रात्रीपासूनच आज (रविवार) दुपारपर्यंत पावसाचा जोर दिसून आला. विदर्भातही जवळपास सर्वच जिल्ह्यांना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. सततच्या पावसामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. हवामान विभागाने ५ मे पर्यंत अवकाळी पाऊस सुरूच राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. आता पाऊस थांबून उन्ह तापू दे, असे साकडे शेतकरी घालत आहेत.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी ८.३० पर्यंत अमरावतीत सर्वाधिक ६३ मिमी, त्यापाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात ३६ मिमी पावसाची नोंद झाली. नागपुरातसुद्धा मध्यरात्रीपासूनच पाऊस कोसळतो आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नागपुरात १२.२ मिमी पावसाची नोंद झाली. अगदी पावसाळ्याचा फिल येत असल्याने सुटीचा दिवस असूनही नागपूरकरांना सकाळपासून घराबाहेर पडताच आले नाही. साऱ्यांचाच दिवस आज उशीराने सुरू झाला. बाहेर जाऊन मौजमजा करण्यापेक्षा घरातच चमचमीत मेनूवर ताव मारण्यावर नागपूरकरांचा भर असल्याचे दिसून येत आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने तारांबळ उडाली.

हवामान विभागाने विदर्भासाठी रविवारी संपूर्ण दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवार आणि मंगळवारीसुद्धा येलो अलर्ट कायम असून, बुधवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे. पावसामुळे किमान तापमानातही कमालीची घट झाली आहे. वातावरणात चांगलाच गारवा जाणवतो आहे.

सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांना अद्याप मशागतपूर्व कामे आटोपता आली नाहीत. पाऊस थांबल्यानंतर आखी काही दिवस कडक उन्ह पडल्यानंतरच मशागतीची तयारी करता येणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.