पुढारी ऑनलाईन : मंगळूर ऑटोरिक्षा बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Mangaluru blast case) आरोपी सय्यद यासीन, मज मुनीर अग्मेद आणि मोहम्मद शारीक यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या स्फोटापूर्वी आरोपींनी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या काठावर स्फोटाचा सराव केली होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
मंगळूर स्फोटातील मुख्य आरोपी मोहम्मद शारिक याच्यावर इस्लामिक स्टेट (IS) या आतंरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा प्रभाव होता. तो दहशतवादी गटाच्या अनेक दिवसांपासून संपर्कात होता. शारिकने सय्यद यासीन आणि मुनीर अग्मेद यांना कट्टरपंथी बनवले. शारिक आणि यासीन हायस्कूलमध्ये एकत्र शिकत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शारिकचा एक हँडलर होता. त्यानेच स्फोटाचा कट रचला आणि कारवाई केली.
बॉम्बस्फोटामागे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचा संशय मंगळूर पोलिसांनी व्यक्त केला होता. याचा आधारे पोलिसांनी तपास सुरु करत शोध मोहिम राबवली. (Mangaluru Blast) बॉम्बस्फोट दहशतवादी संघटनेपासून प्रेरित होऊन केल्याची माहिती एडीजीपी आलोक कुमार यांनी दिली होती.
दोन आरोपींनी शारिकने शेअर केलेल्या पीडीएफ फाइल्स आणि व्हिडिओंमधून बॉम्ब कसा बनवायचा हे शिकून घेतले. त्यांनी बॉम्बसाठी लागणारे टायमर रिले सर्किट ॲमेझॉनद्वारे खरेदी केले. तसच कर्नाटकातील शिवमोग्गा येथे प्रत्येकी दोन 9-व्होल्ट बॅटरी, स्वीच, वायर, माचिस आणि इतर स्फोटक साहित्य खरेदी केले. यानंतर आरोपीने शिवमोग्गा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या काठावर केम्मनगुंडी येथे बॉम्बस्फोटाचा सराव केला होता. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होत हा स्फोट घडवून आणण्यात त्यांना यश आले असल्याचे आरोपींच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
एडीजीपी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षातील प्रवासी 'कुकर बॉम्ब' असलेली बॅग घेऊन जात होता. त्याचा अचानक स्फोट झाला, त्यामुळे प्रवासी तसेच ऑटोचा चालक दोघेही स्फोटातील आगीत होरपळले. ऑटो चालकाचे नाव पुरुषोत्तम पुजारी असून, प्रवाशाचे नाव शारिक असे आहे. आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत. दोन मंगळुरू शहरात आणि एक शिवमोग्गा येथे त्याच्यावर दोन प्रकरणांमध्ये UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या प्रकरणात तो वॉन्टेड होता. तो बराच काळ फरार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
हेही वाचा :