Latest

Mamata Banerjee On Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या…’षडयंत्राची पुनरावृत्ती’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या रांची आणि दिल्लीतील घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यानंतर बुधवारी ३१ जानेवारीला त्यांना ईडीने अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंड मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर 'झामुमो'चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांच्या नावाची झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. (Mamata Banerjee On Hemant Soren)

झारखंडमधील ढवळलेल्या राजकीय परिस्थितीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (Mamata Banerjee On Hemant Soren)

सरकारला कमकुवत करण्याच्या षडयंत्राची पुनरावृत्ती- ममता बॅनर्जी

प. बंगाल मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, आदिवासी नेते हेमंत सोरेन यांच्या अन्यायकारक अटकेचा मी तीव्र निषेध करतो. भाजप-समर्थित केंद्रीय एजन्सींनी सूडबुद्धीने केलेले कृत्य आहे. झारखंडमधील ढवळलेली राजकीय परिस्थिती ही लोकप्रियपणे निवडून आलेल्या सरकारला कमकुवत करण्याच्या नियोजित षडयंत्राची पुनरावृत्ती करते, अशी टीका बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

अटकेतील सोरेन यांच्या पाठीशी उभे राहण्याची ममतांनी घेतली शपथ

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे माझे जवळचे मित्र आहेत. या कठीण काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पित राहून मी त्याच्या पाठीशी अखंडपणे उभे राहण्याची शपथ घेतो. राज्यात सध्या उद्धभवलेल्या अस्थिरतेविरूद्ध झारखंडचे संयमी लोक जबरदस्त प्रतिसाद देतील आणि या महत्त्वपूर्ण लढाईत विजयी होतील, असा विश्वास देखील ममता बॅनर्जी यांनी झारखंडमधील 'झामुमो' सरकार आणि जनतेवर दाखवला आहे.

हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी

झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांची सात तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केल्यानंतर ईडीने ३१ जानेवारी रोजी त्यांना अटक केली होती. झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यानुसार अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोरेन यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. पण न्यायालयाने सोरेन यांच्या कोठडीचा निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होऊन हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT