नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Mahua Moitra Cash for Query : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी लोकसभेच्या नैतिक आचरण समितीची बैठक गुरुवारी (9 नोव्हेंबर) होणार आहे. समितीने चौकशी पूर्ण केली असल्याने अहवाल स्विकारण्यासाठी ही बैठक होईल. त्यात महुआ मोईत्रांवरील कारवाईची शिफारस या बैठकीदरम्यान होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून भेटवस्तू आणि पैसे घेऊन लोकसभेमध्ये अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न विचारले असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारी तक्रार भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी, वकील जय अनंत देहादराय यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दाखल केली होती. यामध्ये महुआ मोईत्रा यांचा संसदेचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांद्वारे वापरण्यात आला. विशेष म्हणजे दुबईमधून वापर करून प्रश्न विचारण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनीही महुआ मोइत्राकडून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळाल्याची कबुली दिली. (Mahua Moitra Cash for Query)
खासदारांच्या आचरणाशी संबंधित असलेले हे प्रकरण लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे प्रकरण भाजप खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील नैतिक आचरण समितीकडे सुपूर्द केले होते. समितीने तक्रारदार खासदार निशिकांत दुबे आणि प्रतिज्ञापत्र सादर करणारे वकील जय अनंत देहदराय यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यांची चौकशी झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांनाही बोलावले होते. मात्र, 2 नोव्हेंबरला महुआ मोईत्रा यांच्या चौकशीसाठी झालेल्या समितीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला होता. समितीच्या अध्यक्षांनी आपल्याला अनैतिक आणि खासगी स्वरुपाचे प्रश्न विचारून आपले शाब्दिक वस्त्रहरण केले असा खळबळजनक आरोप मोईत्रा यांनी केला होता. त्यावर, समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी महुआ मोईत्रांचा प्रयत्न चौकशीत अडथळा आणायचा आहे आणि त्यांनी समितीबद्दल अशोभनीय शब्दांचा वापर केला असल्याचा दावाही केला होता. (Mahua Moitra Cash for Query)
या घटनाक्रमानंतर लोकसभेच्या नैतिक आचरण विषयक समितीने आपली चौकशी पूर्ण केली असून अहवालाचा मसुदा स्वीकारण्यासाठी समितीची मंगळवारी (7 नोव्हेंबर) बैठक बोलावली होती. मात्र ती आता गुरुवारी (9 नोव्हेंबर) होईल. सुत्रांच्या माहितीनुसार समितीतर्फे महुआ मोईत्रा यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस केली जाऊ शकते. महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्वही रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Mahua Moitra Cash for Query)