Latest

Maharashtra MLC Election : नागपूर- भाजपचा बालेकिल्ल्यात पराभव कशामुळे झाला?, जाणून घ्या कारणे

अविनाश सुतार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत (Maharashtra MLC Election) महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. तर भाजप पुरस्कृत आमदार नागो गाणार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या सुधाकर अडबोले यांनी १६ हजार ७०० मते मिळवली. तर नागो गाणार यांना ८ हजार २११ मते मिळाली. नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. परंतु गाणार यांच्या पराभवामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गाणार यांच्याबद्दल अंतर्गत असलेली नाराजी या पराभावाचे मूळ असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघाची (Maharashtra MLC Election) जागा मागील दोन टर्मपासून भाजपकडे होती. गाणार हे गडकरी समर्थक मानले जातात. तर यापूर्वी पराभूत झालेले माजी महापौर संदीप जोशी फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. या निकालाने पुन्हा एकदा नागपुरातील ही दोन सत्ताकेंद्र अधोरेखित केली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना भाजपकडून दरवेळी समर्थन मिळत होते. मात्र, गाणार यांच्याबद्धल संघटनेतच असलेल्या नाराजीमुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, असे चित्र होते. दरम्यान, अखेरच्या क्षणी भाजपने गाणारांना पाठिंबा देत पुन्हा मैदानात उतरविले.

तर शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरून भाजपकडून स्पष्ट आश्वासनाचा अभाव दिसून आला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नसल्याचे स्पष्टच सांगितले होते. विरोधकांनी नेमका हाच मुद्दा पकडून भाजपला कोंडीत पकडले.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले गेले वर्षभरापासून निवडणुकीची मोर्चेबांधणी करत होते. परंतु कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून महाविकास आघाडीत धुसफूस होती. पण अखेरच्या क्षणी राजेंद्र झाडे यांच्याऐवजी अडबाले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आणि मतदारांनीही त्यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला.

शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यासह बहुतांशी उमेदवारांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा लावून धरला. त्यानंतर भाजपनेदेखील नंतर जुनी पेन्शन योजना आम्हीच देऊ शकतो, असे सांगत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. गाणारांबद्धल अंतर्गत नाराजी आणि जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात सुमारे ३४ हजार ३५९ शिक्षक मतदारांनी म्हणजेच ८६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT