Latest

Maharashtra Politics : महाराष्ट्रातही भाजपकडून धक्कातंत्र शक्य; काही खासदार-आमदारांचे तिकीट कापले जाणार!

मोहन कारंडे

मुंबई; नरेश कदम : तीन राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी नेता निवडताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या धक्कातंत्राचा अवलंब केला, तसाच वापर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला जाणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. याअंतर्गत काही खासदारांची तिकिटे कापली जातील. राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल, तर भाजपच्या काही वरिष्ठ मंत्र्यांना विधानसभेची तिकिटे दिली जाणार नाहीत, अशी योजना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आखली जात आहे.

संबंधित बातम्या : 

विशेष म्हणजे २०२४ मध्ये राज्यात पुन्हा सत्ता आली, तर नेतृत्व कोणाकडे असेल? याबाबतही धक्कातंत्र वापरले जाऊ शकेल, असे कळते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने वजनदार नेत्यांना बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनविले. हेच धक्कातंत्राचे मॉडेल भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लागू करेल. जुन्या आणि बड्या नेत्यांना धक्के बसतील. लोकसभेसाठी भाजपने आपल्या प्रत्येक विद्यमान खासदाराची पाच वर्षांतील मतदारसंघ आणि लोकसभेतील कामगिरी याची माहिती ठेवली आहे. त्याचे सामाजिक जीवनातील वर्तन आदी बाबींवर पक्षाच्या यंत्रणेची नजर असते.

मंत्री, पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी यांच्याबाबतची इत्थंभूत माहितीचा डाटा पक्षाच्या यंत्रणेकडे आहे. यावरून कोणाची तिकिटे कापली जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हे ठरविले जाते. याच मॉडेल नुसार तीन राज्यांत उमेदवार निवडले गेले आणि नवे मुख्यमंत्री ठरविले गेले. राज्यात तेच तेच वरिष्ठ नेते हे मंत्रिमंडळात स्थान मिळवितात. पण आता नव्या मॉडेलनुसार या वरिष्ठ मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले जाईल किंवा त्यांना विधानसभेची तिकिटे नाकारली जातील.

अनेक आमदारांचेही तिकीट कापणार

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अर्धा डझन विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाणार आहेत, तर काही नव्या चेहऱ्यांना तिकीट मिळेल. विधानसभेलाही असाच पॅटर्न असेल. अनेक आमदारांना घरी बसविले जाईल. त्यांचेही अहवाल पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेकडे तयार आहेत. राज्यातील मंत्र्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या वर्तुळाकडेही करडी नजर आहे. तीन राज्यांचे नेतृत्व बदलल्यामुळे महाराष्ट्रात काय घडेल? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या राज्यात भाजपचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे तेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा असतील, असे आता तरी बोलले जात आहे. त्यांना आणखी एक संधी मुख्यमंत्रिपदासाठी मिळू शकेल, असे केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आहे. पण शेवटी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतले निकाल तेव्हाची राजकीय आणि सामाजिक स्थिती आदींचा विचार होईल, असेही बोलले जाते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT