पुढारी ऑनलाईन डेस्क : दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात दाखविले. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली खडाखडी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्ता याच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो विधान परिषदेत दाखवून आज (दि. १८) खळबळ उडवून दिली. Winter Session Nagpur
बडगुजर यांच्या एसआयटी चौकशी बरोबरच गिरीश महाजन यांची देखील चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली. त्यानंतर खडसेंच्या मागणीवर उत्तर देताना खडसे यांच्यावर आपण हक्कभंग आणणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. Winter Session Nagpur
खडसे यांच्या आरोपनंतर विधान परिषदेत जोरदार गदारोळ उठला. खडसे यांनी आरोप मागे घ्यावेत, यासाठी सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. त्यानंतर विधान परिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागेल. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खडसे यांच्या आरोपावर उत्तर दिले.
देसाई म्हणाले की, विविध लग्न समारंभासाठी नेते जात असतात. त्याठिकाणी अनेक जणांशी संबंध येत असतो. तेथील फोटो काढले जातात. ज्या व्यक्तीचे सभागृहात नाव घेण्यात आले. तो कुठेही लग्नात जेवताना दिसत नाही. परंतु, एका पक्षाचा महानगर प्रमुख हा नाचताना दिसून येत आहे. विनाकारण सभागृहात एका मंत्र्यांचा उल्लेख केला आहे, तो तत्काळ काढून टाकावा, अशी मागणी शंभूराजे देसाई यांनी केली . काहीतरी काम करत असल्याचे नेत्याला दाखविण्यासाठी आरोप केले जात असल्याचा टोला देसाई यांनी खडसे यांना लगावला.
दरम्यान, सलीम कुत्ता याच्याशी संबंध असलेल्यांना सरकार पाठिशी घालणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याची सर्वांची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट करून सभागृहात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले म्हणून त्यांचे नेते जागे झाले आहेत, असा टोलाही देसाई यांनी माजी मंत्री अनिल परब यांना लगावला.
हेही वाचा