Latest

उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादेत सभा, ‘होय, संभाजीनगरच’ लिहिलेले बॅनर झळकले

दीपक दि. भांदिगरे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख, तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (दि. ८ जून) औरंगाबादेत जाहीर सभा होत आहे. सभेआधी शिवसेनेकडून 'होय संभाजीनगरच' असे बॅनर शहरात झळकले आहेत. तसेच संपूर्ण शहरात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. सभेच्या टीझरमध्येही हिंदुत्वावरच भर देण्यात आला आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे हे हिंदुत्व आणि शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

१ मे रोजी औरंगाबादेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केला. राज ठाकरे यांची ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली होती. आता तिथेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे. सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, वरुण सरदेसाई आदी नेतेही उपस्थित असणार आहेत. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकाचौकामध्ये भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात मोठमोठे बॅनरही लावले गेले आहेत. 'होय, संभाजीनगरच,' असे लिहिलेले अनेक बॅनर लावून, शिवसेनेने शहराच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे उद्या आपल्या भाषणातून 'संभाजीनगर' आणि हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर भर देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चार ठिकाणी पार्किंगची सोय

सभेसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांच्या गाड्यांसाठी कर्णपुरा मैदान, आमखास मैदान, मल्टिपर्पज शाळा मैदान आणि जिल्हा परिषद मैदान या चार ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणांहून सभास्थळी ये-जा करण्यासाठी मिनी बसेसची सोय करण्यात आली आहे, असे शिवसेनेचे विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांनी सांगितले.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT